नाशिक : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद आणि सोबत इतरही पद हवे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

मंगळवारी आठवले हे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत मंत्रीपदाबाबत भूमिका मांडली. विधान परिषदेत नियुक्त केल्या जाणाऱ्या १२ पैकी एक आमदार रिपाइंचा असावा, असाही आमचा आग्रह आहे.

राज्यात नव्याने अस्तित्वात आलेले शिंदे-फडणवीस सरकार राहिलेला कार्यकाळ पूर्ण करेल. २०२४ ची विधानसभा निवडणूक भाजप, सेना आणि रिपाइं हे तीन पक्ष सोबत लढतील आणि २०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेतील बंडाळीवर त्यांनी भाष्य केले. शिवसेनेत उभी फूट पडली असून खरी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचीच आहे. मोठय़ा प्रमाणात आमदार आणि पदाधिकारी शिंदे गटात गेल्यामुळे शिंदेंना चांगली संधी आहे. दोन तृतीयांश आमदार असल्याने शिवसेनेचे चिन्ह शिंदे गटाला मिळेल, अशी आशा आहे. रिपाइंमध्ये निवडून येण्याची ताकद नाही. पक्ष बांधणीचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आम्ही ज्या पक्षाला पािठबा देतो, तो पक्ष निवडून येतो, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या घराणेशाहीच्या विधानावर विरोधकांकडून आक्षेप घेतला जात आहे. या संदर्भात आठवले यांनी राजकारणात घराणेशाही नसावी ही मोदींची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसच्या काळात रस्ते तयार झाले नाहीत. मोदी सरकारच्या काळात मोठय़ा प्रमाणात रस्ते तयार झाल्याचा दावा त्यांनी केला. मुंबई-गोवा महामार्ग खराब झाला असून त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी.

मंत्र्यांनी महामार्गाबाबत तक्रार केली आहे. अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सूचित केले. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांनी शंका व्यक्त केल्याने या अपघाताची चौकशी होणे गरजेचे असून दोषींवर योग्य कारवाई व्हायला हवी, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. बिहारमध्ये नितीशकुमार याआधी लालूप्रसाद यादवांसोबत होते. नंतर मोदींसोबत आले. आता ते राजदसोबत गेले असले तरी पुन्हा मोदींसोबत येतील. पंतप्रधान मोदींसमोर कोणताही चेहरा उभा केला तरी फारसे नुकसान होणार नाही. भाजप मित्रपक्षांना संपवीत असल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे आठवले यांनी नमूद केले.