नाशिक – नाशिक जिल्हा-कायद्याचा बालेकिल्ला असे गुन्हेगारांकडून वदवून घेण्याचा नाशिक पोलिसांचा सपाटा काहीसा कमी झालेला असताना दिवाळीच्या आधीपासून वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे कारागृहात असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि टोळीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. पीएल ग्रुप अर्थात लोंढे टोळी नाशिक पोलिसांनी पुरती नेस्तनाबूत केल्याने या टोळीच्या अत्याचारांमुळे भयभीत झालेल्यांना धीर आला आहे. लोंढे टोळीविरुध्द तक्रारी देण्यास अत्याचारग्रस्त पुढे येऊ लागले आहेत. त्यापैकी नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील एकाने तक्रारीत आपली कैफियत मांडली.

मनमाड येथील विनोद मुनोत (५०) हे औषध दुकानदार आहेत. त्यांचे सातपूर येथे औषध दुकान आहे. २१ एप्रिल २०१९ या दिवशी रात्री आठ वाजता लोंढे टोळीतील संशयित त्यांच्या दुकानात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांना निवडणुकीत पैसे वाटप करण्यासाठी कमी दराच्या नोटांची गरज असल्याने त्या देण्याची मागणी त्यांनी केली. कमी दराच्या नोटांऐवजी जास्त दराच्या नोटा देण्याचे तसेच मूळ रकमेच्या १० टक्के रक्कम देण्याचे प्रलोभनही त्यांनी दाखविले. विनोद मुनोत हे योगेश जाधव यांच्यासह सातपूर एमआयडीसी भागातून जात असताना संशयित केतन भुजबळ आणि त्याचा साथीदार मोटारीतून त्यांच्याजवळ आले. त्यांना बोलावून घेतले.

गावठी बंदूक दाखवित मुनोत यांना जीवे मारण्याची धमकी दिली. रूपेश पवार याने चाकू काढून विनोद मुनोत यांच्याबरोबर असलेल्या योगेश जाधव यांना मारण्याची धमकी दिली. संशयितांनी मारहाण केली. विनोद मुनोत यांच्या हातात त्यावेळी पैशांची पिशवी होती. पिशवीत ३० लाख रुपये होते. ती पिशवी बळजोरी करुन ताब्यात घेण्यात आली.केतन भुजबळ आणि रुपेश पवार यांनी मोटारीचे दोन्ही दरवाजे उघडून मुनोत आणि जाधव यांना धक्का देत मोटारीतून ढकलून दिले. प्रकाश लोढे याचा  मुलगा दीपक लोंढे यानेदेखील नंतर विनोद मुनोत यांना मारण्याची धमकी दिली.

या घटनेला सहा वर्षे झाल्यानंतर नाशिक पोलिसांच्या कारवाईमुळे धीर आलेल्या विनोद मुनोत यांनी सातपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार प्रकाश लोंढे, केतन भुजबळ, रुपेश पवार, गौरव देशमुख, प्रशांत धनेधर, दीपक लोंढे आणि इतर तीन ते चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश लोंढे टोळीतील काही सदस्य मकोका अंतर्गत कारागृहात आहेत. प्रकाश लोंढेविरुध्द नवनवीन गुन्हे दाखल होत असल्याने तो लवकर तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता नाही.