scorecardresearch

बोलण्याच्या नादात रक्कम लंपास

सुब्रत देना यांचे द्वारका परिसरातील महाविनायक हे रंगकाम  साहित्याचे दुकान आहे.

IDBI Bank in nashik
आयडीबीआय बँकेच्या द्वारका शाखेत पैसे भरण्यासाठी आलेल्या खातेदाऱ्याजवळील ८७ हजार रुपयांची रक्कम संशयिताने बोलण्याच्या नादात लंपास केली. 

आयडीबाय बँकेच्या द्वारका शाखेतील प्रकार

गंगापूर रोडवरील सारस्वत बँकेतील लूट प्रकरणातील संशयितांचा अद्याप तपास लागलेला नसतांनाच सोमवारी याच घटनेची पुनरावृत्ती शहरात झाली. आयडीबीआय बँकेच्या द्वारका शाखेत पैसे भरण्यासाठी आलेल्या खातेदाऱ्याजवळील ८७ हजार रुपयांची रक्कम संशयिताने बोलण्याच्या नादात लंपास केली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुब्रत देना यांचे द्वारका परिसरातील महाविनायक हे रंगकाम  साहित्याचे दुकान आहे. त्यांच्याकडे नातेवाईक देवेंद्र सुहाई (४५) हे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. सोमवारी दुपारी दुकानातील दैनंदिन व्यवहारातील ८७ हजार रुपये भरण्यासाठी सुहाई हे द्वारका येथील आयडीबीआय बँकेत गेले.

पैसे भरण्यासाठी पावती लिहित असतांना अंदाजे ५० वर्ष वय असलेली व्यक्ती त्यांच्यामागे येऊन उभी राहिली. पैसे भरण्यासाठी लागणारा वेळ पाहता त्या व्यक्तीने आपण तुमची बँकेची पावती भरतो, तोपर्यंत तुम्ही पैसे मोजा,  असे सांगितले.

सुहाई हे पावतीमध्ये आवश्यक तपशील सांगत असतांना संशयिताने पैसे पडल्याची थाप ठोकली. सुहाई हे पैसे पाहण्यासाठी खाली वाकले असता या संधीचा फायदा घेत संशयित पैसे घेऊन फरार झाला. हा प्रकार लक्षात येताच सुहाई यांनी बँक अधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून संशयित व्यक्ती बँकेतून बाहेर पडल्यावर तडक रिक्षात बसल्याचे दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

भद्रकाली पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली असून  या सर्व प्रकाराचा तपास सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आध़ारे करत आहेत. बँकेच्या आत घडणाऱ्या या प्रकारांमुळे बँकेतील ग्राहकांची सुरक्षितता धोक्यात येत आहे.

बँकेत येणाऱ्या ग्राहकांनी भूलथापांना बळी न पडता आपल्या आर्थिक व्यवहाराकडे लक्ष द्यावे, एखादी संशयित व्यक्ती किंवा संशयास्द हालचाली जाणवल्यास बँक अधिकारी किंवा सुरक्षारक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-04-2018 at 03:19 IST