नाशिक : चांदवड तालुक्यातील मालसाणे येथे णमोकार तीर्थक्षेत्रात आयोजित आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक आणि महामस्तकाभिषेक महोत्सवात मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. पंचपरमेष्ठी मंडपमचे उद्घाटन सरसंघचालक भागवत यांच्या हस्ते होणार असून यावेळी ते मार्गदर्शनही करणार आहेत.
नाशिक-धुळे महामार्गावर मालसाणे गावाजवळ ४० एकर क्षेत्रात जैनधर्मीय णमोकार तीर्थस्थळ आहे. णमोकार तीर्थक्षेत्रात सहा फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा महोत्सव २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या ठिकाणी तीन हजार मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत असून महोत्सवात ३०० ते ४०० जैन साधू, १० ते १२ लाख भाविक सहभागी होण्याचा अंदाज वर्तविला जातो. या सोहळ्यास जैनधर्मियांचा कुंभमेळा म्हटले जाते. महोत्सवात दिग्गज नेते सहभागी होत आहेत. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे, खा. प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. पंचकल्याणक महोत्सव धार्मिक अनुष्ठान नाही, तर देशाच्या प्राचीन, आध्यात्मिक, परंपरा, शांती, करुणा आणि साधनेच्या उत्सवाचे प्रतीक आहे. तीर्थकारांनी दिलेला अहिंसा, शांती आणि करुणेचा संदेश जैन बांधवासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी मार्गदर्शक ठरणारा असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली होती.
आयोजकांनी महोत्सवास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनाही निमंत्रित केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी दुपारी पंचपरमेष्ठी मंडपमचे उद्घाटन आणि समवशरण मंदिराचे दर्शन असा विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या तीर्थ विकासासाठी सरकारने मध्यंतरी ३६ कोटींचा आराखडा मंजूर केला. णमोकार तीर्थ येथे नौकायन (जलपरिक्रमा), अतिविशेष व्यक्तींसाठी तीन हेलिपॅड, वाहनतळ, वीज पुरवठा व्यवस्थेचे बळकटीकरण, काँक्रिट रस्ता व संरक्षक भिंत आदींचा समावेश आहे. महोत्सवासाठी प्रशासनाने स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य पथकाची नियुक्ती केली आहे.
