Namokar Teerth / मालेगाव : मानवी जीवन आणि सृष्टीचे चक्र सतत सुरू राहावे, यासाठी अहिंसा,अनेकांतवाद व अपरिगृह या त्रिसूत्रीचा मार्ग सांगितला गेला आहे. हा मार्ग सांगणाऱ्या आणि त्याचे अनुकरण करणाऱ्या महापुरुषांची भारतात मोठी परंपरा आहे. त्याचा आपल्याला खूप लाभ होत आहे. याच आधारावर भारतवर्ष टिकून राहील आणि भारत टिकला तरच जग टिकेल,असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी केले आहे.
चांदवड तालुक्यातील माळसाने येथील णमोकार तीर्थ येथे आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक आणि महामस्तकाभिषेक महोत्सव सुरू आहे. जैन धर्मियांचा कुंभमेळा समजल्या जाणाऱ्या या महोत्सवात मंगळवारी भागवत हे सहभागी झाले. यावेळी बोलताना त्यांनी संपूर्ण जगाला सुखाचा मार्ग दाखवण्याची वेळ आता आली आहे.
कारण धर्माचा समतोल आणि शिस्त सोडून जगाने भौतिक विकासाची जी वाट धरली, त्यावर जग २००० वर्षे चालले; मात्र त्याचे अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत. सोयी-सुविधा खूप मिळाल्या, पण सुख मात्र लांब गेले आहे. अशा स्थितीत आधुनिक ज्ञान व प्राचीन ज्ञान यांची सांगड घालून धर्म अनुशासनानुसार लोकांनी पुढे जावे आणि सृष्टीला पुढे न्यावे,असा आग्रह भागवत यांनी धरला.
धर्म आचरण सोडणे हे समस्यांचे मूळ
धर्माचे आचरण सोडल्यामुळे आज मानवी जीवनात वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. परंतु भारताचे हे भाग्य आहे की, प्राचीन काळापासून आपल्या हृदयात धर्माचा अवलंब करण्याची बुद्धी जागृत ठेवणाऱ्या महापुरुषांची परंपरा आपल्याला लाभली आहे. हे भाग्य आजही लाभत आहे आणि भविष्यातही मिळत राहील, असा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला.
भारतात पंथ, संप्रदायांसह अनेक बाबतीत विविधता आहे आणि ती स्वीकारण्याची भारताची मनोवृत्ती राहिली आहे. प्रत्येकाची स्वतःची पद्धत आहे, स्वतःचे विचार दर्शन आहे आणि स्वतःचा मार्ग आहे. माझा मार्ग माझ्यासाठी योग्य आहे आणि त्यांचा त्यांच्यासाठी योग्य आहे हे तत्व स्वीकारले जाते.धर्म आचरण करणाऱ्या समाजामुळे विविधतेतून एकता निर्माण झाली,असेही भागवत यांनी नमूद केले. याप्रसंगी गणाचार्य कुंथूसागर महाराज, आचार्य देवनंदनजी महाराज,आमदार डॉ. राहुल आहेर, चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, संयोजन समितीचे अध्यक्ष राहुल भंडारी आदी उपस्थित होते.
मान्यवरांचा सहभाग
चांदवड तालुक्यातील मालसाणे येथे णमोकार तीर्थक्षेत्रात ६ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक आणि महामस्तकाभिषेक महोत्सव सुरु आहे. जैनधर्मियांचा कुंभमेळा समजल्या जाणाऱ्या या महोत्सवात मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सहभागी झाले. यावेळी भागवत यांच्या हस्ते पंचपरमेष्ठी मंडपमचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालसाणे गावाजवळ ४० एकर क्षेत्रात जैनधर्मीय णमोकार तीर्थस्थळ साकारण्यात आले आहे. या ठिकाणी महोत्सव काळात तीन हजार मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत असून ३०० ते ४०० जैन साधू, १० ते १२ लाख भाविक महोत्सवात सहभागी होण्याचा अंदाज आहे.
गेल्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या महोत्सवात सहभागी झाले होते. त्यानंतर भागवत हे या महोत्सवात सहभागी झाले. या महोत्सवासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

