लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : समाज माध्यमात आलेल्या सैन्य भरतीच्या पत्रावर विश्वास ठेवून देवळाली कॅम्प येथे आलेल्या युवकांना शनिवारी मनस्ताप सहन करावा लागला. भरती ही अफवा ठरल्याने युवकांना मनस्ताप सहन करावा लागला.
सैन्य भरती प्रक्रिया राबवल्या जाणाऱ्या देवळाली कॅम्प येथे १५ सप्टेंबरच्या पहाटेपासून ११६ इन्फंट्री बटालियनसाठी प्रादेशिक भरती होणार असल्याचा संदेश आणि बनावट पत्र काही दिवसांपासून समाजमाध्यमात फिरत होते. यावर विश्वास ठेवून अकोला, बीडसह राज्यभरातील शेकडो युवक शनिवारी सकाळीच नऊ वाजता देवळाली कॅम्प येथे पोहोचले. तरुणांचे लोंढेच्या लोंढे धडकू लागल्याने कॅम्प परिसर गजबजला. परंतु, भरतीबद्दल कुठलीच अधिकृत माहिती न मिळाल्याने त्यांचा गोंधळ उडाला.
आणखी वाचा-रस्त्यांच्या अवस्थेवरुन जामनेर तालुक्यात गिरीश महाजनांवर प्रश्नांची सरबत्ती
स्थानिक केंद्राकडून अशी कुठलीही भरती नसल्याचे सांगण्यात आले. शिवयुवा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेनेही युवकांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे स्थानकावर फलकाद्वारे भरती नसल्याचे नमूद केले. तरूणांनी भाकरी खात अफवा पसरविणाऱ्यांचा निषेध करत परतीचा रस्ता धरला. देवळाली कॅम्प शहर युवासेनेचे शहरप्रमुख प्रमोद मोजाड यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाव्दारे संबंधित भरतीच्या पत्राची चौकशी करण्याची मागणी आधीच केली होती.
दरम्यान, शिवयुवा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भरतीच्या अपेक्षेने आलेल्या युवकांना नाश्ता वाटप केला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मोजाड, उपशहरप्रमुख विलास संगमनेरे, रवींद्र चौधरी, राजेंद्र बेरड, ज्ञानेश्वर शिंदे, किरण मुसळे, प्रवीण सोनवणे, निखील बेरड आदी उपस्थित होते.