नाशिक – नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटीपुढे हजर होण्यासाठी अखेर रविवारी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर नाशिकमध्ये दुपारी दाखल झाल्या. रुपाली चाकणकर यांच्यावर अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, राष्ट्रवादी काँग्रेसच्याच (अजित पवार) रुपाली ठोंबरे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी विविध प्रकारचे आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर एसआयटीपुढे काय म्हणणे मांडणार, याची प्रचंड उत्सुकता सर्वांना असताना नाशिक शहरात दाखल होताच रुपाली चाकणकर यांच्या वाहनांचा ताफा सिडकोकडे वळल्याने सर्वच चकित झाले.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील अशोक खरातच्या काळ्या कृत्यांमुळे लहानशा मिरगावचे नाव संपूर्ण राज्यात पसरले. अशोक खरातच्या दरबारात कोणकोणत्या राजकीय नेत्यांनी, उद्योजकांनी हजेरी लावली होती, त्याची चर्चा सर्वत्र झाली. त्यात सर्वाधिक चर्चा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची झाली. खरात प्रकरणात चाकणकर यांचा नेमका संबंध काय, याविषयी कुतूहल वाढले असताना रविवारी रुाली चाकणकर या एसआयटीसमोर उपस्थित राहण्यासाठी नाशिक येथे आल्या. रविवारी सकाळी त्या पुण्याहून नाशिककडे निघाल्या. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत असलेल्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती पुढे आली.
नाशिक शहरात रुपाली चाकणकर यांचा ताफा शिरल्यावर हा ताफा महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीकडे जाईल, असा सर्वांचा कयास होता. परंतु, अचानक ताफा सिडकोकडे वळला. सर्व वाहने सिडकोतील पांगरे मळा परिसरातील एका इमारतीजवळ थांबला. इमारतीखाली नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) दिवंगत अध्यक्ष रवींद्र पगार यांचे पुत्र आकाश पगार यांनी रुपाली चाकणकर यांचे स्वागत केले. त्यानंतर रुपाली चाकणकर या पगार यांच्या निवासस्थानी आल्या.
रुपाली चाकणकर यांचे आमच्या घरी येणे हे अचानक ठरल्याचे रवींद्र पगार यांचे पुत्र आकाश पगार यांनी सांगितले. अर्ध्या तासापूर्वी रुपाली चाकणकर यांचा फोन आला. त्यांनी त्या घरी येत असल्याचे आणि घराच्या ठावठिकाण्याचे लोकेशन पाठविण्यास सांगितले. रुपालीताई या घरी आल्यावर त्यांनी नानांच्या म्हणजेच माझ्या वडिलांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले, असे आकाश पगार यांनी सांगितले. यावेळी रुपाली चाकणकर यांनी आकाश यांच्यासह त्यांची पत्नी, आई यांचे सांत्वन केले.
रवींद्र पगार यांच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. अजितदादा हे महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या इतर जिल्हाध्यक्षांनाही रवींद्र पगार यांच्या कार्याचे उदाहरण देत असत. त्याचे आपण साक्षी होतो, असे रुपाली चाकणकर यांंनी नमूद केले. मालेगाव तालुक्यातील एका गावात बालिकेवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर त्या गावी भेट देण्यासाठी मी निघाले असता रवींद्र पगार यांना आधी फोन केला. ते तातडीने हजर झाले, याची आठवणही रुपाली चाकणकर यांनी सांगितली. यावेळी चाकणकर यांच्याबरोबर त्यांचे बंधू, वकील उपस्थित होते, अशी माहिती आकाश पगार यांनी दिली. पगार यांच्या घराकडून रुपाली चाकणकर यांचा ताफा पुढे रवाना झाला.
