नाशिक : अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या अशोक खरात याच्या कृष्णकृत्याचे वेगवेगळे पैलु समोर येत असतांना या त्याच्या दुष्कृत्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना खरात यांच्याशी असलेल्या जवळिकीमुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गट महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा चाकणकर यांनी द्यावा, यासाठी राज्यात महिला आघाडी सक्रिय झाली आहे.

अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातने एका युवतीवर लग्नाआधी आणि लग्नानंतरही शारीरिक अत्याचार केले. त्याच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळत पीडित युवतीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात याच्या विरूध्द तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल झाला. या सर्व प्रकरणाला वाचा फुटल्यावर रुपाली चाकणकर या खरात यांना गुरू मानत, त्यांचे पाद्यपूजन करीत, त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी डोक्यावर छत्री धरीत, यासह खरात याच्या श्री ईशान्येश्वर मंदिरात पूजा करणे आदी छायाचित्रे समाज माध्यमात आली..

याशिवाय खरातविरूध्द आवाज उठविणाऱ्या पत्रकारालाही चाकणकर यांनी धमकी दिली. तसेच चाकणकर यांना खरातच्या मिरगाव येथील श्री शिवनिका देवस्थानच्या कार्यकारिणीतही स्थान देण्यात आले होते. या सर्व प्रकाराचे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटले. चाकणकर यांच्यावर होणाऱ्या चौफेर टिकेमुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पाय उतार व्हावे लागले. आता त्यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदावर टांगती तलवार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाची महिला आघाडी सक्रिय झाली आहे. नाशिक जिल्हातील भगूर, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, देवळालीसह अन्य तालुक्यातून रुपाली चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा जनमानसात चांगली आहे. चाकणकर यांच्या गैरवर्तणुकीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

सामान्य जनता आणि विशेषत: महिला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या आशेने पाहतात. आणि न्यायासाठी एक माध्यम म्हणून पक्षावर विश्वास ठेवत असताना चाकणकर यांच्यासारख्या व्यक्तीमुळे पक्षाच्या या विश्वासाला तडा गेला आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याची कोणाचीही मानसिकता राहिलेली नाही. या पार्श्वभूमीवर पक्षहिताचा विचार करुन रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्षपदावरून आणि पक्षातील इतर सर्व जबाबदाऱ्यांमधून तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत उपमुख्यमंत्री तसेच पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांना निवेदन देण्यात आले.