नाशिक: संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरात प्रकरणात खरातनंतर सर्वाधिक चर्चेत असलेली आणि वादग्रस्त ठरलेली व्यक्ती म्हणजे राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर होय. महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक अशा प्रकरणात खरातबरोबर अनेक राजकीय नेते, उद्योजकांचे नाव जोडले गेले. त्यात रुपाली चाकणकर हे नाव प्रमुख होते. खरातला पोलिसांनी ज्या दिवशी ताब्यात घेतले, त्या दिवसापासून चाकणकर यांना पोलीस कधी ताब्यात घेतील, त्यांची कधी चौकशी होईल, असे प्रश्न विचारले जात होते.

एसआयटीपुढे हजर होण्यासाठी अखेर रविवारी रुपाली चाकणकर नाशिकमध्ये आल्या. एसआयटीपुढे त्यांना सुमारे सहा तास थांबावे लागले. एसआयटीकडून त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. एसआयटीने विचारलेले प्रश्नही चर्चेत आहेत.

रुपाली चाकणकर यांच्यावर अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, राष्ट्रवादी काँग्रेसच्याच (अजित पवार) रुपाली ठोंबरे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी विविध प्रकारचे आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर एसआयटीपुढे काय म्हणणे मांडणार, याची प्रचंड उत्सुकता सर्वांना असताना नाशिक शहरात दाखल होताच रुपाली चाकणकर यांच्या वाहनांचा ताफा सिडकोकडे वळल्याने सर्वच चकित झाले.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे अशोक खरातने श्री शिवनिका संस्थानतंर्गत श्री ईशान्येश्वर मंदिर बांधले. या श्री शिवनिका संस्थानच्या वििश्वस्त मंडळात रुपाली चाकणकर यांचाही सहभाग होता. अशोक खरातच्या दरबारात कोणकोणत्या राजकीय नेत्यांनी, उद्योजकांनी हजेरी लावली होती, त्याची माहिती समाज माध्यमातून पुढे येत गेली. खरात प्रकरणात चाकणकर यांचा नेमका संबंध काय, याविषयी कुतूहल वाढले असताना रविवारी रुाली चाकणकर या एसआयटीसमोर उपस्थित राहण्यासाठी नाशिक येथे आल्या.

नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत असलेल्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात विशेष तपास पथक अर्थात एसआयटीकडून त्यांची चौकशी करण्यात आली. दुपारी १२ वाजेनंतर एसआयटीपुढे गेलेल्या रुपाली चाकणकर यांची सायंकाळी पाचनंतरच सुटका झाली. चौकशी आटोपून मोटारीतून बाहेर पडलेल्या चाकणकर यांनी मोटारीतूनच माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील ताण स्पष्टपणे दिसत होता.

रुपाली चाकणकर यांचा दावा

पोलिसांना आवश्यक ते सर्व सहकार्य आपण तपासात केले आहे, असा दावा रुपाली चाकणकर यांनी केला. तपास यंत्रणांबरोबर सविस्तरपणे बोले. मला काय प्रश्न विचारले, त्यासंदर्भातील अहवाल आल्यावर तुम्हांला कळेलच. मी आता पुण्याला निघाले आहे, असे सांगून चाकणकर मोटारीतून लगेच निघून गेल्या.

एसआयटीकडून प्रश्नांची सरबत्ती

एसआयटीने रुपाली चाकणकर यांच्यावर अक्षरश: प्रश्नांची सरबत्ती केल्याची माहिती पुढे आली आहे. अशोक खरातबरोबर केव्हापासून संबंध होते, शिवनिका संस्थानवर कार्यरत असताना अशोक खरातच्या कृत्यांची माहिती होती का, खरातबरोबर तुम्ही ज्या पूजा तसेच विधी केल्या, त्या नेमक्या कोणत्या होत्या, अशोक खरातशी पूजा विधीने काही आर्थिक संबंध जोडले होते का, अशोक खरातबरोबर काढलेले फोटो, व्हिडिओ नेमके कधीचे आणि कोणत्या कार्यक्रमातील आहेत, शिवनिका संस्थानव्दारे कोणते कामकाज केले जात होते, असा प्रश्नांचा पाऊसच एसआयटीने पाडला.

विशेष म्हणजे, एसआयटीचे पथक प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी थेट रुपाली चाकणकर यांच्याशी दोन तासांहून अधिक वेळ चौकशी केल्याचे सांगितले जाते. अशोक खरातच्या मंदिरात येणारी राजकीय मंडळी कोणाच्या सांगण्यावरून येत होती, अशोक खरात शीसंबंधित आर्थिक व्यवहार कोणकोणत्या बँक खात्यांमधून झाले, या प्रश्नांची उत्तरेही रुपाली चाकणकर यांच्याकडून जाणून घेण्यात आली.