नाशिक – भोंदू ज्योतिषी अशोक खरात यास लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व प्रकाराचे पडसाद राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उमटत असतांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरूध्द महिला प्रतिनिधी एकत्र येण्यास सुरूवात झाली. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर तोफ डागली. दुसरीकडे, चाकणकर यांनी खरात यांच्यावरील आरोपांची पोलीस निष्पक्ष चौकशी करतील असा विश्वास व्यक्त केला.
सिन्नर येथील भोंदू अशोक खरातकडे राजकीय नेत्यांसह नामांकित व्यक्ती भविष्य पाहण्यासाठी जात होत्या. नाशिक येथील एका उच्चशिक्षित महिलेने खरातविरुध्द लैंगिक शाेषण केल्याची तक्रार दाखल केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या खरात अध्यक्ष असलेल्या श्री शिवनिका संस्थानच्या कार्यकारिणीत सदस्य आहेत. चाकणकर या खरातचे पाय धूत असल्याचे तसेच त्याच्यावर छत्री धरीत असल्याच्या चित्रफिती समाज माध्यमात आल्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले.
खरातकडून होणाऱ्या लैंगिक शोषण प्रकरणी माध्यमांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता संबंधित पत्रकाराकडून माफीनामा लिहून घेण्यात आला. चाकणकर पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करतात. सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या चाकणकर यांना महिला आयोगावर ठेवण्यात पक्षाची कोणती राजकीय अपरिहार्यता आहे, असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे यांनीही चाकणकर यांच्यावर आरोप केले. महिलांचे शोषण करणाऱ्यांविरूध्द आवाज उठविणाऱ्या माध्यम प्रतिनिधीकडून माफीनामा का लिहून घेतला, संविधानिक पदावर असतांना सार्वजनिक ठिकाणी त्यांचा असणारा वावर याकडे ठोंबरे यांनी लक्ष वेधले. चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहिल्यासर या प्रकरणाची चौकशी नीट होणार नाही, असे ठोंबरे यांनी नमूद केले.
दरम्यान, चाकणकर यांच्यावर होणारी चौफेर टीका, त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतांना चाकणकर यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. चाकणकर यांनी सांगितले की, कॅप्टन खरात यांचे वैयक्तीक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत. त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर पूर्ण विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.
