सदानंद जोशी, अतुल पेठे, नीता कोठेकर आदींना नाटय़ परिषदेचे पुरस्कार | Loksatta

सदानंद जोशी, अतुल पेठे, नीता कोठेकर आदींना नाटय़ परिषदेचे पुरस्कार

पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रारंभी रेखा नाडगौडा यांच्या शिष्या नांदी सादर करत नटवराला नमन करणार

सदानंद जोशी, अतुल पेठे, नीता कोठेकर आदींना नाटय़ परिषदेचे पुरस्कार
सदानंद जोशी ,अतुल पेठे

५ नोव्हेंबरला पुरस्कार वितरण सोहळा

ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, नीता कोठेकर, अतुल पेठे आदींची अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद नाशिक शाखेच्या वतीने रंगभूमी दिनाचे औचित्य साधत देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण नाटय़ परिषद मध्यवर्तीचे कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

सांस्कृतिक क्षेत्रातील विशेष योगदान पुरस्कार यंदा जाहीर झाल्याची माहिती नाटय़ परिषदेचे नाशिक शाखा अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी दिली. गेल्या दोन वर्षांपासून येथील नाटय़ परिषद नाशिक शाखेच्या वतीने रंगभूमीवर योगदान दिलेल्या कलावंतांचा सन्मान व्हावा या उद्देशाने दिवंगत दिग्गज रंगकर्मीच्या नावाने पुरस्कार देण्यात येत आहे. यंदाचे पुरस्कारात दत्ता भट स्मृती पुरस्कार (अभिनय) ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, शांता जोग स्मृती पुरस्कार नीता कोठेकर, प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार (दिग्दर्शन) अतुल पेठे, रावसाहेब अंधारे स्मृती पुरस्कार (नेपथ्य) आनंद ढाकीफळे, गिरिधर मोरे स्मृती पुरस्कार (प्रकाश योजना) साठी सतीश सामंत यांची निवड करण्यात आली.

तसेच वा. श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार (बाल रंगभूमी) शीला सामंत, जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार (सांस्कृतिक पत्रकारिता) ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार टेणी यांना जाहीर झाला. या वर्षांपासून प्रा. रामदास बरकले स्मृती पुरस्कार हा लोककलावंतासाठी देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी माजी मंत्री बबन घोलप यांची निवड करण्यात आली. पुरस्काराचे स्वरूप दोन हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे आहे.

या शिवाय सांस्कृतिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. नृत्य क्षेत्राला आपल्या नृत्याविष्काराने नवा आयाम देत नृत्य साधना करणाऱ्या ज्येष्ठ नृत्यांगना रेखा नाडगौडा, संजीवनी कुलकर्णी, विद्याहरी देशपांडे (कथक) आणि मीरा धानू (भरतनाटय़म्) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

रंगभूमीशी नाळ जोडलेल्या दिवंगत रंगकर्मीच्या कुटुंबीयांचाही सन्मान करण्यात येणार असून यामध्ये अरुण राहणे, प्रमोद भडकमकर, गोकुळ सिन्नरकर, रमेश तिवारी यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. त्यांना सन्मानपत्र तसेच कलावंताच्या नावे स्मृतिदीप देत त्यांचा सन्मान होईल. निवड समितीत प्रा. कदम यांच्यासह प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, विवेक गरुड, रवींद्र ढवळे, प्रदीप पाटील यांनी काम पाहिले.

पुरस्कार वितरण सोहळा ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मु. श. औरंगाबादकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार आहे.

‘संगीत देव बाभळी’चे सादरीकरण

पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रारंभी रेखा नाडगौडा यांच्या शिष्या नांदी सादर करत नटवराला नमन करणार असून नंतरच्या सत्रात मध्यवर्तीच्या आंतर नाटय़ स्पर्धेत विजेते ठरलेले नाशिक शाखेचे प्राजक्त देशमुख लिखीत ‘संगीत देव बाभळी’ नाटक सादर होईल. कार्यक्रम रसिकांना खुला असून नाशिककरांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाटय़ परिषदेने केले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-11-2017 at 00:24 IST
Next Story
पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस