नाशिक – इंडियन प्रिमियर लीग २०२६ मध्ये अनेक चमत्कार पाहण्यात मिळत आहेत. अगदी ७६ धावांवर एखादा संघ गारद होण्यापासून २६४ धावांचे लक्ष्यही गाठले जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे विराट कोहली, ट्रेव्हिस हेड, शुभमन गिल यांसारखे अनुभवी फलंदाज चमकत असताना वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा यांसारखे नवोदित खेळाडूही गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडताना दिसत आहेत. नाशिककरांचे लक्ष मात्र दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यांकडे लागून असते. दिल्ली कॅपिटल्सने मागील सामन्यात आरसीबीविरुध्द नाशिकचा डावखुरा आक्रमक सलामीवीर साहिल पारखला संधी दिली. परंतु, आपल्या पहिल्या आयपीएल सामन्यात भोपळाही फोडता न आलेला साहिल पारख पहिला डाव देवाला याप्रमाणे आता आपल्या दुसऱ्या संधीची वाट पहात आहे. एक मे रोजी साहिल पारख राजस्थान राॅयल्सविरुध्द दिल्ली कॅपिटल्ससाठी आपली गुणवत्ता दाखवून देईल, असा नाशिककरांना विश्वास आहे.

आयपीएल स्पर्धेत उतरणाऱ्या संघांची नजर नाशिकच्या क्रिकेटपटूंवर गेली असून यंदाच्या आयपीएलमध्ये एकाचवेळी दोन नाशिककर खेळाडूंची निवड झाली आहे. आयपीएल स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्सने साहिल पारखची आपल्या ताफ्यात निवड केली आहे. चेन्नई सुपरकिंग्जने नाशिकच्याच रामकृष्ण घोष यास कायम ठेवले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात के. एल. राहुल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, डेव्हीड मिलर यासारख्या दर्जेदार खेळाडूंचा सहभाग आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर खेळणे आणि त्यांच्या खेळाचा जवळून अनुभव घेण्याची संधी साहिलला यानिमित्ताने मिळत आहे.

युवा क्रिकेटपटूंना आपले कौशल्य राष्ट्रीय पातळीवर सिध्द करण्यासाठी सी. के. नायडू चषक ही महत्वपूर्ण स्पर्धा मानली जाते. यंदाच्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात नाशिकचा आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखची निवड झाली होती. याआधी ज्या, ज्या स्पर्धेसाठी निवड झाली, त्या स्पर्धा साहिलने गाजवल्या असल्याने सी. के. नायडू चषक स्पर्धेतील त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. या स्पर्धेत त्याने चमक दाखवली. सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धा, विनू मंकड स्पर्ध त्याने गाजवळी. सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत, केवळ ७५ चेंडूत १४ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद १०९ धावा फटकावल्या होत्या.

साहिल पारखमधील गुणवत्ता पाहूनच दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या संघात घेतले. आरसीबीविरुध्द मागील सामन्यात साहिल पारखला अनुभवी के. एल. राहुलसह सलामीला जाण्याची संधी मिळाली. परंतु, आरसीबीचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दुसऱ्याच चेेडूवर साहिलचा त्रिफळा उडवला होता. आता एक मे रोजी साहिल पारख यास दिल्ली कॅपिटल्स राजस्थान राॅयल्सविरुध्द पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे.