नाशिक – इंडियन प्रिमियर लीग क्रिकेट अर्थात आयपीएलचे आकर्षणच वेगळे आहे. २०२६ या वर्षासाठी मंगळवारी अबुधाबी येथे मिनी लिलाव होणार आहे. प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न एकदा तरी आयपीएलमध्ये खेळावे हे असते. आयपीएलमध्ये इतर स्पर्धांच्या मानाने मिळणारा सर्वाधिक पैसा हे तर त्यामागील एक कारण आहेच. शिवाय, या स्पर्धेतून झटपट मिळणारी लोकप्रियताही खेळाडूंना आकर्षित करीत आहे.

युवा खेळाडूंना आयपीएल आपल्यातील गुणवत्ता दाखविण्यासाठी एक मंच ठरत आहे. मागील आयपीएलमध्ये बिहारचा वैभव सूर्यवंशी, मुंबईचा आयुष म्हात्रे ही दोन नावे गाजली. त्यामुळे आयपीएल संघ मालकांचे अशाच धडाकेबाज युवा खेळाडूंकडे अधिक लक्ष आहे. आगामी आयपीएल स्पर्धेसाठी १६ डिसेंबर रोजी अबुधाबी येथे लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावाकडे नाशिक शहरातील क्रिकेटपटूंचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यासाठी कारणही तसेच आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयतर्फे २०२६ वर्षातील इंडियन प्रिमियर लीगसाठी २४० भारतीय खेळाडुंसह १४ सहयोगी देशातील मिळून एकूण ३५० क्रिकेटपटूंवर लिलावात बोली लागणार आहे. नाशिकचा अष्टपैलू रामकृष्ण घोषची मागील हंगामाप्रमाणेच यंदा देखील आगामी आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी, महेंद्रसिंग धोनीच्या बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सतर्फे (सीएसके) याआधीच निवड झाली आहे.

मागील वर्षी सीएसके संघाने आयपीएल लिलावात रामकृष्ण घोषला आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले होते. त्याला आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने संघात कायम (रिटेन) ठेवले आहे. इतर खेळाडूंसाठी १६ डिसेंबर रोजी लिलाव होईल. त्यात नाशिकच्या साहिल पारख या युवा धडाकेबाज सलामीवीराचेही नाव आहे.

साहिलने नुकतेच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत वरिष्ठ महाराष्ट्र संघात पदार्पण केले. १९ वर्षांखालील वयोगटासाठीच्या विनू मंकड स्पर्धेत साहिल महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवित आहे. नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा, हे सर्व नाशिककरांचे स्वप्न साहिल पारखने साकार केले.

सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत केवळ ७५ चेंडूत १४ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद १०९ धावा फटकावत, भारतीय संघाला केवळ २२ षटकांतच नऊ गडी राखून जोरदार विजय मिळवून दिला होता.

एन. सी. ए, बेंगळुरूतर्फे भारतभरातील उदयोन्मुख , युवा खेळाडूंसाठी झालेल्या शिबिरात साहिलची सलग तीन वर्षांपासून निवड होत आहे. त्यानंतर आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील बीसीसीआयच्या इंटर एनसीए स्पर्धेत इंडिया बी कडून खेळताना एकदिवसीय सामन्यात साहिलने अतिशय आक्रमक व सातत्यपूर्ण धडाकेबाज फलंदाजी केली होती.

वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधारपदा पाठोपाठ आता आयपीएलसाठीच्या लिलाव यादीत साहिलची निवड झाली आहे.