अंदाजपत्रक गुलदस्त्यात

अनिकेत साठे

नाशिक :  ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असले तरी त्याचे अंदाजपत्रक मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. मार्चमध्ये संमेलनास अंदाजे चार ते पाच कोटींचा खर्च गृहीत धरला गेला होता. संमेलनाची तारीख आणि स्थळ बदलल्यामुळे अंदाजपत्रक कमी होण्याऐवजी विविध कारणांनी वाढतच आहे. संमेलनाच्या वाढत्या खर्चावर पूर्वी कठोर शब्दांत ताशेरे ओढणारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आता मात्र मौन धारण करून आहे.

नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या कोटीच्या कोटी उड्डाणावरून आधीच बराच गदारोळ उडाला होता. यामुळे संमेलनाच्या अंदाजित खर्चाबाबत फारशी वाच्यता केली जात नाही. भुजबळ नॉलेज सिटी या नवीन संमेलन स्थळी अनेक पायाभूत सुविधा अस्तित्वात आहेत. त्यामुळे खर्चात कपात होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, येथेही अनेक व्यवस्था उभाराव्या लागतील. साहित्य प्रेमींना शहरात मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. अशा कारणांनी खर्च वाढणार असल्याचे संयोजक सांगतात. निधी संकलनास चांगला प्रतिसाद मिळत आहे. संमेलनातील विविध कामांसाठीच्या निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या. दराबाबत प्रत्यक्ष चर्चा करून तडजोड सुरू आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर खर्चाचा अंदाज येईल, असे संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगांवकर यांनी सांगितले.

काही व्यावसायिक कार्यक्रमांमुळे खर्चात भर पडणार आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दोन डिसेंबर रोजी डॉ. सलील कुलकर्णी-संदीप खरे जोडीचा माझे जीवीची आवडी हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. समारोपाच्या दिवशी नाशिककरांसाठी भव्य व्यावसायिक कार्यक्रमाच्या आयोजनाचा विचार होत आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चार डिसेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक कलावंतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन आहे. पण तो व्यावसायिक स्वरूपाचा नाही. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ तथा विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हेलिकॉप्टरने संमेलन नगरीत आणण्याचा विचार आहे. प्रायोजकत्व मिळाल्यास तो विचार केला जाणार असल्याचे जातेगावकर यांनी म्हटले आहे. शहरात साहित्यप्रेमींची संमेलन स्थळी ने-आण करण्यासाठी २०० बसचा ताफा सज्ज ठेवला जाणार आहे. अशा अनेक कारणांनी खर्च वाढत आहे.

साहित्य महामंडळाने दीड कोटी रुपयांत उत्तम संमेलन होऊ शकते, याकडे आधीच लक्ष वेधले होते. आमदार निधीतून घेतल्या जाणाऱ्या पैशाला लोकवर्गणी म्हणता येत नाही. लोकसहभाग वाढवून वर्गणी काढण्याची सूचना केली होती. पण आयोजकांनी त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे स्वागत समिती सदस्यांची संख्या शंभरी पार करू शकलेली नाही. खर्चाच्या मुद्यावरून पूर्वी ताशेरे ओढणारे महामंडळाचे पदाधिकारी सध्या मौन बाळगून आहेत. महामंडळाने कार्यक्रम पत्रिका तयार करून दिली. आचारसंहिताही संयोजकांना दिलेली आहे. नाशिकचे संमेलन बरेच लांबले. त्यात नाहक फाटे फोडण्याऐवजी ते एकदाचे पार पडावे, या विचाराप्रत पदाधिकारी आले आहेत.