समितीच्या मागण्यांकडे आयोजकांचे दुर्लक्ष

चारूशीला कुलकर्णी

नाशिक : साहित्य संमेलनानिमित्त अवघी नगरी सुशोभित करण्याचे मनसुबे रचले गेले तथापि दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या संमेलनाचे फलक वगळता शहरात कुठेही सुशोभिकरण झालेले दिसत नाही. या कामाची जबाबदारी असलेल्या शहर सुशोभिकरण समितीलाच आपले नेमके काय काम? असा प्रश्न पडला आहे. आयोजक आणि विविध समित्यांचे पदाधिकारी यांच्यात संवादाचा अभाव असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या सहकार्याने आयोजक लोकहितवादी मंडळाकडून संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वी मार्च मध्ये हे संमेलन होणार होते. करोनामुळे स्थगित झालेले हे संमेलन डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात होत आहे. संमेलनाच्या तयारीसाठी तब्बल ११ महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या विविध समित्या आजही अंधारात चाचपडत आहेत. त्यापैकीच एक शहर सुशोभिकरण समिती. या समितीच्या वतीने ११ महिन्याच्या कालावधीत संमेलन नेटके व्हावे यासाठी वेगवेगळय़ा संकल्पनांवर काम सुरू होते. ११ महिन्याच्या कालावधीत समितीचे काम थांबले नाही. शहरात संमेलनाचे वातावरण तयार व्हावे यासाठी शहराकडे येणारे सर्व महामार्ग, रस्त्यांवरील प्रवेशद्वारे तसेच रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरातही सजावट करण्यात येणार होती. शहर परिसरातील मुख्य मार्गावर रांगोळी काढणे, कवी कुसुमाग्रज, प्रा. वसंत कानेटकर, वामनदादा कर्डक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासह अन्य साहित्यिकांची छायाचित्रे, त्यांची संक्षिप्त माहिती फलकाच्या माध्यमातून शहर परिसरात लावण्यात येणार होती. ग्रंथ दिडिंत मराठी साहित्यातील उच्चतम अशा १०० पुस्तकांचे मुखपृष्ट  पताका म्हणून वापरण्याचे नियोजन करण्यात आले होते, अशी माहिती समिती समन्वयक शाम लोंढे यांनी माहिती दिली

यासाठी शहरातील वास्तुविशारद, रांगोळीकार, कलावंत असे १५० हून अधिक जण समितीच्या माध्यमातून एकत्र आले. आयोजकांना या नियोजनाच्या अनुषंगाने सूचना करण्यात आल्या. मानधन किंवा कामासाठी लागणारे सामान देण्यात यावे एवढी माफक अपेक्षा होती. परंतु, आयोजकांनी सुचना, मागण्या यांचा विचार केला नाही. समितीचे काम काय? या विषयी माहिती दिली नाही. यामुळे सारेच नाराज झाले असल्याचे लोंढे सांगितले. आयोजकच जर सर्व काही पाहणार असतील तर समिती स्थापन का केली? असा प्रश्न लोंढे यांनी उपस्थित केला.

संमेलन अवघ्या ४८ तासांवर आले असतांना शहरात संमेलनानिमित्त काय सुशोभिकरण करायचे याची माहिती दिलेली नाही. वेळ हातातून निघून गेली आहे. आता केवळ पाहाणे एवढेच काम बाकी असल्याची अगतिकता लोंढे यांनी व्यक्त केली.

काही गैरसमज झाले असावेत

शहर सुशोभिकरण समितीने सुचविलेल्या संकल्पना, सूचना आणि मार्गदर्शनानुसारच काम सुरू आहे. लोढें यांचा काही गैरसमज झाला असेल किंवा संवादाचा अभाव यामुळे ही तक्रार असेल. कामात काही अडचणी निर्माण झाल्या असतील. पण त्यावर पर्याय शोधून वेळेत काम पूर्ण होईल.

मुकूंद कुलकर्णी  (कार्याध्यक्ष, लोकहितवादी मंडळ)