नाशिक – गडकिल्ले, गिर्यारोहण आणि गिरीभ्रमण क्षेत्रात महाराष्ट्रातील प्रसिध्द अशा संस्थांपैकी एक असलेली संस्था म्हणून नाशिक येथील रविवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेचा लौकिक आहे. संस्थेच्या ४१ व्या वर्धोपन दिनानिमित्त २७ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय गिर्यारोहण, सुरक्षा आणि शाश्वत पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत पुरातत्व, पोलीस, पर्यटन, गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील महत्वाच्या अधिकार्यांचा सहभाग राहणार असून गिर्यारोहण, गिरीभ्रमण करताना घ्यावयाची दक्षता यांसह इतर अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील सह्याद्रीची पर्वतरांग, ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळे ही राज्याची मोठी ओळख आहेच. मात्र, अलिकडच्या काळात वाढती गर्दी, आपत्कालीन प्रसंग, निसर्गाची हानी आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटन, वनविभाग, पुरातत्व विभाग, पोलीस आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे गिर्यारोहक आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी या विशेष परिषदेचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. या परिषदेतील मान्यवरांच्या सूचनावरून राज्य शासनास “सजग गिरीभ्रमण” (Mindful Trekking and Tourism) विषयी सूचना व उपायांचा मसूदा सादर करण्यात येणार आहे.
परिषदेत विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. दुर्गभ्रमण, गिरीभ्रमण करताना अचानक उदभवणारी एक समस्या म्हणजे मधमाशा. नाशिकजवळील रामशेजसह अनेक गडकिल्ल्यांवर मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, डंख मारला, असे प्रकार घडत असतात. मधमाश्यांनी अशाप्रकारे हल्ला केल्यावर नेमके काय करावे, हे बहुसंख्य पर्यटक, दुर्ग भ्रमंती करणाऱ्यांना माहीत नसते. या गंभीर विषयावरही या परिषदेत मार्गदर्शन होणार आहे.
या परिषदेत डॉ. तेजस गर्गे (संचालक, पुरातत्व विभाग, महाराष्ट्र), विकास पानसरे (संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ), श्रीकृष्ण देशपांडे (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नाशिक), उमेश झिरपे (अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ), अशोक बुरंगे (सरपंच, ग्रुपग्रामपंचायत कळमुस्ते, साल्हेर), डॉ. डी. एस. स्वामी ( जिल्हा पोलीस अधीक्षक, नाशिक), संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त, नाशिक) या प्रमुख मान्यवरांचा सहभाग राहणार आहे.
नाशिक येथील गंगापूर रस्त्यावरील शंकराचार्य न्यासातील कुर्तकोटी सभागृहात २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९-०० ते सायंकाळी ६-०० या वेळेत ही परिषद होणार असून उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशांत परदेशी, राहूल सोनवणे, डाॅ. ज्ञानेश्वर गुंजाळ, मनोज बाग आणि राजेश नागरे यांनी केले आहे.
प्रमुख उद्दिष्टे
१) सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थापन: डोंगर पर्यटन, गिरीभ्रमण, तसेच धबधबे, नद्या, धरण, समुद्रकिनारे इत्यादी पाण्याच्या ठिकाणी होणारे अपघात तसेच दुर्गम भागात गिरीभ्रमण, पर्यटना दरम्यान घडणार्या दुघर्टना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी तत्पर मदत यंत्रणा पाचारण करण्यासाठी आराखडा तयार करणे.
२) ऐतिहासिक व पर्यावरण संवर्धन: पुरातत्व व वनविभागाच्या नियमांचे पालन करत गड-किल्ले आणि संवेदनशील निसर्ग क्षेत्रांचे जतन करणे, प्राचीन वास्तू, अवशेषांचे जतन व संवर्धन.
३) स्थानिक रोजगार व पर्यटन सुधारणा: गिरीस्थानातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पर्यटनाला शिस्तबद्ध स्वरूप देऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे
४) मार्गदर्शक तत्त्वे: गिरीभ्रमण, डोंगरयात्रा, गिर्यारोहण व डोंगर, दर्या, नद्या जलपरिसर अशा आव्हानात्मक ठिकाणच्या पर्यटकांसाठी शिस्त, नियम आणि सुरक्षेच्या स्पष्ट नियमावली निश्चित करणे.
