नाशिक – “सैराट” चित्रपटाच्या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण भारतात प्रसिध्द झालेले मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. चाकोरीबाहेरील कलाकारांना आपल्या चित्रपटांमध्ये संधी देण्यासाठी जसे ते ओळखले जातात, त्याचप्रमाणे चित्रपटांमधून वेगवेगळे विषय हाताळणीसाठीही ते ओळखले जातात. दुसरीकडे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकमधील आतापर्यंतची कारकीर्द अपयश आणि यश अशा दोन प्रकारांमध्ये विभागली गेली आहे. सध्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हेही प्रसिध्दीच्या शिखरावर आहेत. हे दोन दिग्गज नाशिकमध्ये लवकरच एकत्र येणार आहेत. त्यासाठी कारणही विशेष आहे.

चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला “सैराट” हा सर्वाधिक कमाई करुन देणारा चित्रपट दिला. या चित्रपटामुळे नागराज मंजुळे या नावाची दखल भारतीय चित्रपटसृष्टीला घ्यावी लागली. या चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीही त्यांच्याकडे आकर्षित झाली. त्यांना अनेक चित्रपट करण्याच्या ऑफर आल्या. परंतु, नागराज मंजुळे यांनी निवडकच चित्रपट केले. हटके हाताळणीमुळे नागराज मंजुळे यांचा पुढील चित्रपट कोणता, याची उत्सुकता सर्वांनाच असते.

नागराज मंजुळे हे मनोरंजन क्षेत्रातील प्रसिध्द नाव तर, दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था क्षेत्रातील संदीप कर्णिक हे नाव. नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून सध्या संदीप कर्णिक कार्यरत आहेत. मागील वर्षाच्या उत्तरार्धापर्यंत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यावर नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे चौफेर टीका होत होती. सर्वसामान्य नागरिकांपासून व्यापारी, उद्योजक, महिला असे सर्वच घटक त्यांच्यावर नाराज होते. परंतु, त्यानंतर अचानक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या धडाडीची दुसरी बाजू नाशिककरांसमोर आली. पोलीस आयुक्त सक्रिय झाल्याचे दिसून आले. गुन्हेगारांना पळता भुई थोडी झाली. त्यामुळे टीका करणारे नाशिककर आता त्यांचे कौतुक करु लागले आहेत. प्रसिध्दीच्या शिखरावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आहेत.

नागराज मंजुळे आणि संदीप कर्णिक या दोन व्यक्तींना एकत्र पाहण्याची संधी लवकरच मिळणार आहे. त्यासाठी निमित्त ठरले आहे नाशिकचे गिरणा गौरव प्रतिष्ठान. गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे २७ वे गिरणा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून,यंदाच्या पुरस्कारासाठी चित्रपट दिग्दर्शक व निर्माते नागराज मंजुळे तसेच “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” हे गुन्हेगारांकडून वदवून घेणारे आणि नाशिकची सुरक्षा यंत्रणा बळकट करणारे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कार्यरत पत्रकार विलास बडे, जिल्हा परिषद शाळा जागतिक पातळीवर घेऊन जाणारे आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांच्यासह सहा विभुतींना गिरणा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

इतर पुरस्कारार्थींमध्ये दत्तात्रय वारे (पुणे), सहकार महर्षी श्रीराम शेटे ( दिंडोरी), लोकसेवेसाठी प्रकाश दायमा (निफाड), समाजसेवक मुक्तेश्वर शेट्टीवर (नाशिक), आदर्श ग्रामसेवेसाठी वर्षा ठाकरे (धुळे), योगगुरु प्रज्ञा पाटील (नाशिक), समाजसेवक प्रकाशचंद्र सोनाग्रा (सटाणा), आदर्श शिक्षणसेवेसाठी शैंलेद्र सोनजे (मालेगाव), समाजसेवक रतन चौधरी( सुरगाणा) यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महाकवी कालिदास कला मंदिरात पाच एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली.

निवड समितीच्या बैठकीत या पुरस्कारांर्थींची घोषणा करण्यात आली. मानपत्र स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे २७ वे वर्ष असून, यात प्रामुख्याने सामाजिक, साहित्य, शैक्षणिक, सहकार, कला, संगीत आदी क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंताना हा उत्तर महाराष्ट्राचा मानाचा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदा या पुरस्कारासाठी शिवराज नरवडे,विद्यानंद पाटील,भगवान गायकवाड, भाऊसाहेब राजोळे, अनिल निकम, अशोक पाटील, या समितीने पुरस्कारार्थीची निवड केली.