धुळे : मध्यप्रदेश मधून निघाल्यावर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी सुखकारक आणि वेगवान प्रवास शक्य आहे. साक्री – पिंपळनेर राष्ट्रीय महामार्गाचे २१ किलो मीटर कॉंक्रिटीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे.

मध्य प्रदेशातील थेट खेतीया येथून सुरू होऊन महाराष्ट्रातील शहादा, प्रकाशा, नंदुरबार, साक्री, पिंपळनेर, सटाणा, देवळा मार्गे शिर्डीला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग (क्र. ७५२ जी) हा उत्तर महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा दळणवळण मार्ग आहे. या महामार्गावरील साक्री–सामोडे–पिंपळनेर या टप्प्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकाम सुरू असून त्यामुळे परिसरातील वाहतूक, व्यापार आणि दैनंदिन जीवनमानाला चालना मिळणार आहे.

या टप्प्यातील रस्त्याची एकूण लांबी २१.४०० किलोमीटर असून सुमारे ११६.१० कोटी रुपये खर्चून हे काम करण्यात येत आहे. या महामार्गावर १० मीटर रुंदीचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून दोन्ही बाजूंना प्रत्येकी २ मीटर रुंदीची साईड पट्टी विकसित केली जात आहे. यामुळे जड वाहने, प्रवासी वाहतूक तसेच स्थानिक वाहनांसाठी रस्ता अधिक सुरक्षित आणि टिकाऊ ठरणार आहे.

या प्रकल्पात चार लहान पूल, एक मोठा पूल रुंदीकरणासह तसेच विविध ठिकाणी मोऱ्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. साक्री येथील कान नदीवर मोठ्या पुलाचे रुंदीकरण सुरू असून सामोडे येथील जामखेडी नदीवर एक लहान पूल तसेच तीन नाल्यांवर पूल उभारण्यात येत आहेत. पावसाळ्यात वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि रस्ता बंद होण्याची समस्या या कामांमुळे दूर होणार आहे. हा रस्ता साक्री, भाडणे, कासारे, धाडणे, शेणपूर, सामोडे ते पिंपळनेर या गावांना जोडतो. या भागातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि भाविकांसाठी हा महामार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शेतीमालाची वाहतूक जलद होण्याबरोबरच स्थानिक बाजारपेठांना मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पाचे कंत्राट गुजरात येथील सरस्वती कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून कामाची एकूण मुदत १८ महिने आहे. २१ एप्रिल २०२५ रोजी कामास सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे ५५ टक्के भौतिक प्रगती साध्य झाली आहे. उर्वरित काम वेगाने सुरू असून नियोजित कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग ७५२ जीवरील हा विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मध्य प्रदेश, नंदुरबार, धुळे, नाशिक आणि शिर्डी यांना जोडणारा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. परिणामी, उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला या महामार्गामुळे नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याशिवाय या महामार्गाच्या विकासामुळे साक्री व पिंपळनेर तालुक्यातील औद्योगिक, शैक्षणिक आणि आरोग्य सेवांपर्यंत पोहोच सुलभ होणार आहे. शिर्डी, नाशिक तसेच मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी हा मार्ग अधिक वेगवान ठरणार असून अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने देखभाल खर्चात बचत होऊन रस्त्याचे आयुष्य वाढणार आहे. स्थानिक नागरिकांनी या कामाबाबत समाधान व्यक्त केले असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतुकीस खुला करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.