नाशिक – लासलगाव येथील शिवनदी संवर्धनासाठी ११.५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होऊन शिवनदी संवर्धनाच्या कामाला सुरुवात होणार असल्याने लासलगाव कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

माजी खासदार समीर भुजबळ यांनी लासलगाव बाह्यवळण रस्ता, कचरा डेपो, पाटोदा रस्त्यावरील पूल या कामाची पाहणी केली. यावेळी लासलगाव कचरा डेपोच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याची सूचना समीर भुजबळ यांनी संबंधिताना केली. यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवनदी संवर्धन योजनेंतर्गत लासलगाव बंधाऱ्यांपासून पुढे तीन किलोमीटर अंतरावर नदीतील गाळ काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी जॉगिंग ट्रॅक, स्वतंत्र मलजलवाहिनी, वृक्षारोपण, घाट बांधणी, कचरा व्यवस्थापन व प्रक्रिया, परिसर सुशोभिकरण, पथदीप यासह विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक दिवसापासूनचा लासलगाव कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

लासलगाव कचरा डेपो परिसरातील रस्त्यांची काम तातडीने करून वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्याच्या सूचना भुजबळ यांनी संबंधिताना केल्या. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून सुरू असलेल्या लासलगाव बाह्यवळण रस्ता, शिवनदीवरील पूल या कामांची समीर भुजबळ यांनी पाहणी केली. या कामाला गती देऊन नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी संबंधितांना केल्या.