तीन दिवसांत १ हजार १०० जणांचे सत्कार;ग्रंथ दिंडीतील विद्यार्थी, स्वयंसेवक यांना सन्मानपत्र देणे बाकी

अनिकेत साठे

नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांत १ हजार १०० हून अधिक व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. हा एक विक्रमच आहे. संमेलनाचे उद्घाटन, समारोप यासह परिसंवाद, मुलाखत आदी कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांबरोबरच निमंत्रितांचे कवी संमेलन, कवि आणि गझल कट्टा यावर सादरीकरण करणारे कवी, गझलकार यांना संयोजकांनी सन्मानित केले. सत्कारार्थीच्या संख्येने  १,१०० चा टप्पा गाठला असला तरी ग्रंथ दिंडीतील शालेय विद्यार्थी, संमेलनातील स्वयंसेवक आणि संमेलनातील विविध कामात सहभागी झालेल्या शेकडो सदस्यांना सन्मानपत्र देऊन गौरविणे अद्यापही बाकी आहे. म्हणजेच सत्कारमूर्तीची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे.

विविध कारणांनी गाजलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे रविवारी सूप वाजले. तीन दिवसात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनात राज्यासह परराज्यातून मोठय़ा संख्येने साहित्यप्रेमी सहभागी झाले होते. उद्घाटन, समारोप, परिसंवाद, मुलाखत कार्यक्रमात सहभागी प्रमुख मान्यवरांचा आटोपशीर सत्कार करण्याची संकल्पना स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी नियोजनावेळीच मांडली होती. सत्कारात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आदी दिले जाते. पण, हे सर्व एकाचवेळी स्वीकारताना सत्कारार्थीची दमछाक होते, हा दाखला त्यांनी दिला होता. त्यांच्या सूचनेनुसार संमेलनात नेटके सत्काराचे नियोजन सत्कार समितीने केले होते. त्यानुसार मुख्य कार्यक्रमांत सहभागी झालेल्या प्रमुख पाहुण्यांचा स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.  

कवि कट्टय़ावर सलग कविता वाचनाद्वारे विक्रम करण्याचा संयोजकांचा मानस होता. पण, तो विविध कारणांनी तो पूर्ण करणे अवघड झाले. कवी कट्टय़ासाठी सुमारे पाच हजार कविता प्राप्त झाल्या होत्या. त्यातून ५०० कवितांची निवड करण्यात आली. संमेलन काळात प्रत्यक्षात ५९० कवींनी कविता सादर केल्याचे बोलीभाषा आणि कविकट्टा समितीचे संतोष वाटपाडे यांनी सांगितले. बाल कवी संमेलनात १९० आणि निमंत्रितांच्या कवी संमेलनात ५६ कवींनी तर गझल कट्टय़ावर १८५ गझल सादर झाल्या. या सर्वाना सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी स्थानिक कलावंतांचा आनंदयात्रा (एक सांस्कृतिक कार्यक्रम) सादर झाला. त्यात नाशिकचे दीडशेहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. त्यांना सन्मानपत्राने गौरविण्यात आले.

नाशिकच्या साहित्य संमेलनात तीन दिवसांत तब्बल ११०० मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. एखाद्या संमेलनात इतक्या मोठय़ा प्रमाणात नेटके सत्कार झाल्याची ही पहिलीच घटना आहे. ग्रंथ िदडीतील साडे तीन हजार सहभागींना सन्मानपत्राने गौरविणे अद्याप बाकी आहे. संमेलनातात सुमारे ७०० स्वयंसेवक कार्यरत होते. त्यांनाही सन्मानपत्र दिले जाणार आहे.

– अनघा धोडपकर (प्रमुख, सत्कार समिती)