नाशिक: मुंबई आणि नागपूर या महानगरांना जोडणारा समृध्दी महामार्ग वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असतो. विशेषत्वाने महामार्गावर होणारे अपघात सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला असताना समृध्दी महामार्गाने होणाऱ्या जलद वाहतुकीचा वापर आता वेगवेगळ्या मालाच्या तस्करीसाठीहो होऊ लागल्याचे उघड झाले आहे. असाच एक प्रकार नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात उघड झाला आहे.
समृध्दी महामार्ग नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातून जातो. इगतपुरी तालुका मुंबईपासून जवळ असल्याने इगतपुरी आणि मुंबई याचे वेगळेच नाते आहे. इगतपुरी तालुका अनेक अवैध धंद्यांसाठीही ओळखला जातो. इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात आणि इतरत्र प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत आहे. असाच एक प्रकार इगतपुरी पोलीस आणि अन्न प्रशासन यंत्रणा यांनी सापळा रचून सुमारे ६९ लाख ३३ हजार रुपयांचा गुटखा, सुगंधीत तंबाखुसह वाहतुक करणारे कंटेनर जप्त करून तीन जणांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक सारीका अहिरराव यांना प्रतिबंधीत गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे अन्न प्रशासन विभागाच्या पथकासह पोलीस पथकाने सापळा रचून पिंप्री सदो समृद्धी टोलनाका इंटरचेंजजवळ गुरुवारी रात्री बंदी असलेली सुगंधित तंबाखू, जर्दा, गुटखा वाहतूक करणारा कंटेनर पकडला. या कंटेनरमधुन ६९ लाख ३३ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. गुटखा तस्करीसाठी वापरण्यात आलेला कंटेनरही पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सहआयुक्त तथा अन्न सुरक्षा अधिकारी सुहास मंडलिक (५४) यांच्या फिर्यादीवरून राजेश गोवर्धनलालजी वर्मा ( माळी) वय ५३, रा डोसीगांव ता. जि. रतलाम, मध्य प्रदेश, जालीम सिंग, रा. सेन्ट्रल पॉईंट, इंदूर, मध्य प्रदेश, आणि एका मोबाईल नंबरवर कॉल करणारी अज्ञात व्यक्ती या तीन संशयितांवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सारीका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गामधनी, पोलीस निलेश देवराज, अभिजित पोटींदे, दीपक मोरे, सचिन बाबा, विजय रूद्रे, मधुकर पवार आदी पोलीस पथक पुढील तपास करीत आहे.
समृद्धी महामार्गासारख्या महत्त्वाच्या मार्गाचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी होत असून तस्करीसाठीही वापर होत आहे. समृद्धी महामार्ग हा गुन्हेगारीचा अड्डा होत असल्याने यापुढे तपासणी अधिक कडक करण्यात येणार आहेत. पोलीस गस्ती फेऱ्या वाढविल्या आहेत.
- सारीका अहिरराव (पोलीस निरीक्षक)
