नाशिक – मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या तीन ते चार घटनांमुळे चर्चेत आला. कित्येक कोटी खर्च करुन उभारलेल्या या महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा यानिमित्ताने पुढे आला. वाहनधारकांमध्ये या घटनांची तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने आता पोलिसांनी समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेचासाठी नाशिक जिल्ह्यात विशेष उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मलढोण आणि दुशिंगपूर शिवारात गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळक्याने वाहनांच्या मार्गात खिळे आणि धारदार लोखंडी वस्तू टाकून वाहनांचे टायर पंक्चर करुन लुटमारी केली. दीड तास लूटमार केली जात असतानाही महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेला त्याचा थांगपत्ताही न लागल्याने प्रवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. गुरुवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब मोटारीने मुंबईच्या दिशेने निघाले होते. रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी वस्तूंमुळे मोटारीचे टायर फुटले.
त्यामुळे मोटार थांबताच दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने संधी साधली. भयभीत झालेल्या मोटारीतील सर्वांनी अंगावरील सोन्याचे दागिने, घड्याळे आणि ८४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटारुंना दिला. या घटनेनेतर अजून एक प्रकार घडला. मुंबईहून नांदेडकडे परतणाऱ्या वाहन व्यावसायिकाच्या मोटारीचे टायर महामार्गावर टाकण्यातआलेल्या खिळ्यांमुळे फुटले. त्यानंतर हातात धारदार हत्यारे घेतलेले पाच ते सहा जण समृध्दी महामार्गावर कठडे ओलांडून मोटारीकडे धावत आले. धोका पाहून व्यावसायिकाने स्वत:कडे असलेल्या परवानाधारक बंदुकीूतने हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे लुटारु पळून गेले. त्यानंतर पाठीमागून आलेल्या वावी पोलिसांनी सर्व माहिती घेतली. या घटनांमुळे समृध्दी महामार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनी आता स्वत:च्या सुरक्षेची काळजी स्वत:च करावी काय, असा प्रश्न करण्यात येत आहे.
समृद्धी महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि वावी हद्दीत एकाच रात्री घडलेल्या या लुटमारीच्या घटनांमुळे जिल्हा पोलीस चांगलेच सतर्क झाले. आपल्या हद्दीतील महामार्गावरील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी ९६ किलोमीटरच्या भागात २४ तास गस्त घालण्याचे पोलिसांनी ठरविले आहे. नाशिक जिल्ह्यात वावी, सिन्नर, घोटी आणि इगतपुरी या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत समृद्धी महामार्गाचा ९६ किलोमीटरचा भाग आहे. समृध्दी महामार्गावर फारशी वर्दळ राहत नसल्याचा फायदा घेऊन गुन्हेगारी टोळ्या या भागात सक्रिय झाल्या आहेत.
एकाच रात्रीतील लुटीच्या घटनांमुळे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी समृद्धी महामार्गावर फिरुन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. या घटनांची गंभीर दखल घेत समृध्दी महामार्गावर गस्तीसाठी नवीन पथक तैनात करण्यात आले आहे. प्रवाशांनी भीती न बाळगता निर्धास्त प्रवास करावा, असे आवाहन नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी केले आहे.
पोलिसांकडून कोणती खबरदारी
नाशिक जिल्ह्यात समृध्दी महामार्गावरील प्रवाशांची लूट रोखण्यासाठी आता ६ विशेष वाहने आणि ३० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण ९६ किलोमीटर अंतरात महामार्गावर विशेष पोलीस वाहनांव्दारे गस्त घालण्यात येणार आहे. गस्ती पथकांसाठी समृध्दी महामार्गावर नेमून दिलेल्या टप्प्यातच २४ तास फिरते राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यात समृध्दी महामार्गावर कुठे काही अघटित घडत असल्यास पथक काही मिनिटांत घटनास्थळी पोहचू शकेल.
