नाशिक – महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांना थेट जोडणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अलीकडेच घडलेल्या लुटमारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. समृद्धी महामार्ग विकासाचा महामार्ग म्हणून सांगण्यात आला होता. त्यावर वाहनधारकांना लुटण्याचे प्रकार अतिशय दुर्दैवी असून, राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातले पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मलढोण व दुशिंगपूर येथे मध्यरात्री वाहनांचे टायर पंक्चर करून एक ते दीड तास लूटमार झाली होती. वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वाहनधारकांची लूट झाली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी समृद्धी महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नाशिक दौऱ्यावर असणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घटनाक्रमावर भाष्य केले. मुळात राज्यात रस्ते, पूल आदी पायाभूत सुविधा झाल्या पाहिजेत, याविषयी कोणतेही दुमत नाही. समृद्धी महामार्गावर खर्च किती झाला, हा वेगळा विषय असून, जेव्हा सत्ता बदल होईल, तेव्हा त्याची चौकशी केली जाईल. परंतु, कुठलाही ‘एक्स्प्रेस वे’ अथवा ‘ॲक्सेस कंट्रोल’ महामार्ग उभारताना काही अंतरावर जनसुविधा असल्या पाहिजेत. राष्ट्रीय महामार्गाची तशी नियमावली आहे. ठराविक अंतरावर पेट्रोल पंप, इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्र, उपाहारगृह व स्वच्छतागृह अशा किमान सुविधा असणे अभिप्रेत आहे.
परंतु, कोणत्या ठेकेदाराला ही दुकाने द्यायची, यावरून सत्ताधारी पक्षांत वाद झाले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गावर कुठेही जनसुविधा व थांबे नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. समृद्धी महामार्गावरील लुटमारीच्या, दरोड्याच्या घटना दुर्दैवी असून, त्यास सरकार जबाबदार आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृह विभाग असून, समृद्धी महामार्गावरील या घटनांकडे त्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या तीन ते चार घटनांमुळे चर्चेत आला. या महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब मोटारीने मुंबईच्या दिशेने निघाले होते. रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी वस्तूंमुळे मोटारीचे टायर फुटले. त्यामुळे मोटार थांबताच दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने संधी साधली. भयभीत झालेल्या मोटारीतील सर्वांनी अंगावरील सोन्याचे दागिने, घड्याळे आणि ८४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटारुंना दिला. या घटनेनेतर अजून एक प्रकार घडला.
मुंबईहून नांदेडकडे परतणाऱ्या वाहन व्यावसायिकाच्या मोटारीचे टायर महामार्गावर टाकण्यात आलेल्या खिळ्यांमुळे फुटले. त्यानंतर हातात धारदार हत्यारे घेतलेले पाच ते सहा जण कठडे ओलांडून मोटारीकडे धावत आले. धोका पाहून व्यावसायिकाने स्वत:कडे असलेल्या परवानाधारक बंदुकीतून हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे लुटारु पळून गेले. या घटनांमुळे जिल्हा पोलीस सतर्क झाले असून ९६ किलोमीटरच्या भागात २४ तास गस्त घालण्याचे ठरविले आहे.
