नाशिक – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका कायम असून रविवारी रात्री इगतपुरी तालुक्यातील धामणीजवळ कंटेनर उलटल्याने नागपूरला जाणारी वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. अपघातग्रस्त कंटेनर महामार्गावर आडवा झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दोन ते तीन तासांपासून वाहने अडकून पडल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले.
रविवारी रात्री इगतपुरीच्या धामणीलगतच्या चॅनेल क्रमांक ६०८ येथे हा अपघात झाला. नागपूर ते मुंबई जलद प्रवासासाठी उभारण्यात आलेला समृद्धी महामार्ग वाढत्या अपघातांनी सातत्याने चर्चेत असतो. महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा हा महामार्ग वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व ठाणे या जिल्ह्यांतून जातो. सरळ मार्गावर वाहने चालवताना चालकाला डुलकी लागणे, टायर फुटणे, ओव्हरटेक करताना नियमांचे उल्लंघन, वाहनातील तांत्रिक दोष अशी काही कारणे सांगितली जातात. रविवारी रात्रीचा अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, याची अद्याप स्पष्टता झालेली नाही. चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि तो उलटला असावा, असा अंदाज प्रत्यक्षदर्शींकडून वर्तविला जात आहे.
रविवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर महामार्गावर आडवा झाला. परिणामी, मुंबईहून नागपूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. या घटनेची माहिती मिळताच घोटीच्या महामार्ग पोलीस केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तीन तासांपासून मुंबईहून नागपूरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून शेकडे वाहनधारक अडकून पडले आहेत. अपघातग्रस्त अवजड कंटेनर महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली.
ठाणे, मुंबई व आसपासच्या भागातील वाहतूक कोंडीतून बाहेर पडणारे वाहनधारक मुंबई-नाशिक (आग्रा) राष्ट्रीय महामार्गावरील आमणे फाटा येथून समृद्धी महामार्गावर येतात. समृद्धी महामार्गामुळे जलदपणे मार्गक्रमण करता येते. प्रवासाचा कालावधी बराच कमी होत असल्याने केवळ नागपूर किंवा विदर्भात जाणारेच नव्हे तर, नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील बहुतांशी वाहनधारक याच महामार्गाला प्राधान्य देतात. रविवारी रात्री भिवंडीतील वाहतूक कोंडीतून बाहेर पडलेल्या वाहनधारकांना कंटेनर अपघातामुळे समृद्धी महामार्गावर देखील तशीच अनुभूती घ्यावी लागली. इगतपुरी तालुक्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताने दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत होण्यास किती कालावधी लागेल, याची स्पष्टता झालेली नाही. रात्री उशिरापर्यंत अपघातग्रस्त कंटेनर हटवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
क्रेनच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न
या अपघातात चालक अजिनाथ खाडे (२७, शिरूर कासार बीड) हे किरकोळ जखमी झाले. कंटेनर आडवा झाल्यामुळे मुंबई-नागपूर मार्गावरील तीनही लेनची वाहतूक ठप्प झाली. क्रेनच्या मदतीने रात्री उशिरा कंटेनरचा पुढील भाग बाजूला करून एक लेनवरील वाहतूक सुरू करण्यात आली. कंटेनर बाजूला करण्यासाठी शक्तिशाली क्रेन मागविण्यात आली आहे. ही क्रेन आल्यानंतर कंटेनर बाजुला करून तीनही लेनवरील वाहतूक सुरू केली जाईल, असे महामार्ग पोलीस विभागाचे उपनिरीक्षक पंजाबराव साळुंखे यांनी सांगितले. तसेच अपघातामुळे नागपूर कॉरिडॉर ‘इगतपुरी एक्झिट’कडे वळवण्यात आला आहे.

