नाशिक – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर वाहनधारकांना मारहाण करून लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी धडक कारवाई करीत ४८ तासांत जेरबंद केले. धाराशिव येथे एकाचवेळी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेण्यात आले. दरोड्यातील सर्व संशयित हे धाराशिव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्या फरार पाच साथीदारांचा शोध सुरू आहे.
या कारवाईची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. २७ ऑगस्ट रोजी रात्री मलढोण शिवारात छत्रपती संभाजीनगर येथील एका कुटुंबाला लुटण्याची घटना घडली होती. मारुती सुझुकी मोटारीच्या चाकाखाली लोखंडी वस्तू फेकून त्यांची गाडी रोखण्यात आली. त्यानंतर ११ ते १२ जणांच्या टोळक्याने तक्रारदारासह कुटुंबीयांना मारहाण केली. त्यांच्याकडील १८ लाख नऊ हजारांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यावेळी पाठीमागून येणाऱ्या अन्य गाड्याही अडवून लाकडी दांडक्याने मारहाण करीत रोख रक्कम काढून दरोडा टाकला होता. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलिसांनी विविध पथके तयार करून तपासाची चक्रे फिरवली. स्थानिक गुन्हे शाखा आणि वावी पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. समृद्धी महामार्ग परिसरातील घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रण आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास केला असता, संशयित हे धाराशिव जिल्ह्यातील असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. पथकांनी १५० ते २०० किलोमीटर अंतरावरील सीसीटीव्ही चित्रणाची पडताळणी करून हा गुन्हा उघडकीस आणल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी नमूद केले.
रात्रभर पाळत, मग छापा
नाशिक ग्रामीण पोलिसांची चार पथके धाराशिव जिल्ह्यात धडकली. तेथे पथकांनी धाराशिव पोलिसांच्या मदतीने रात्रभर पाळत ठेवून एकाचवेळी छापा टाकला. या कारवाईत धाराशिव येथील नितीन उर्फ सुनील शिंदे (३४, खामकरवाडी, वाशी), गोविंद पवार (१९, लक्ष्मीपीठ, वाशी), अशोक शिंदे (३७, खामकरवाडी, वाशी), अर्जुन पवार (५५, येरमाळा, कळंब), धनाजी पवार (२२, येरमाळा, कळंब), लखन काळे (२२, खामकरवाडी, वाशी) आणि गोविंद उर्फ रामा पवार (५०, उमरा, कळंब) यांना अटक करण्यात आली. संशयितांनी समृद्धी महामार्गावर रात्री पाळत ठेवून, वाहनांच्या पुढे लोखंडी वस्तू टाकून ती थांबवून लुटमार केल्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने या संशयितांची आठ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
पाच अद्याप फरार
टोळीतील अटकेतील आणि फरार सदस्य धाराशिव येथील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर महामार्गावरील लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात धाराशिव येथील अर्जुन शिंदे (खामकरवाडी, वाशी), अनिकेत उर्फ अनिल शिंदे (खामगारवाडी) आणि अशोक पवार (गणेशनगर, येरमाळा) आणि शंकर काळे (कळंब) यांच्यासह पाच जण फरार आहेत. त्यांना जेरबंद केल्यानंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
