नाशिक – मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग कधी अपघातांमुळे तर कधी लुटमारीमुळे चर्चेत राहतो. या महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा दावा करण्यात येत असला तरी कित्येक कोटी खर्च करुन उभारलेल्या या महामार्गावरील प्रवासात प्रवासी असुरक्षितच असल्याचे अलीकडेच घडलेल्या दोन घटनांमुळे दिसून आल्याने प्रवासी सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर झाला आहे.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मलढोण आणि दुशिंगपूर शिवारात गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळक्याने लुटमारीसाठी एक वेगळीच पध्दत वापरली. लूटमारी करणाऱ्यांनी धावत्या वाहनांच्या मार्गात खिळे आणि धारदार लोखंडी वस्तू टाकून वाहनांचे टायर पंक्चर करुन लुटमारीचा डाव साधळा. लाखो रुपयांची लुटालूट करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दीड तासांहून अधिक काळ चाललेल्या या प्रकारात तीन वाहने लक्ष्य करण्यात आली. वावी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी उच्च तांत्रिक सुविधांचा वापर करण्यात आल्याचे मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाबाबतीत सांगितले जाते. परंतु, दीड तास लूटमार केली जात असतानाही महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेला त्याचा थांगपत्तीही लागत नसेल, लुटमारीच्या ठिकाणी तात्काळ पोलीस पोहोचू शकत नसतील, तर काय म्हणावे ? मुंबई-नागपूर महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवरुन वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.

गुरुवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब मोटारीने मुंबईच्या दिशेने निघाले होते. रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी वस्तूंमुळे मोटारीचे टायर फुटले. त्यामुळे मोटार थांबताच दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने संधी साधली. टोळक्याने लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मोटारीतील लहान मुलेही टोळक्याच्या तावडीतून सुटली नाहीत. त्यांनी लहान मुलांना बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भयभीत झालेल्या मोटारीतील सर्वांनी अंगावरील सोन्याचे दागिने, घड्याळे आणि ८४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटारुंना दिला.

या घटनेनेतर अजून एक प्रकार घडला. मुंबईहून नांदेडकडे परतणाऱ्या वाहन व्यावसायिकाच्या मोटारीचे टायर महामार्गावर टाकण्यातआलेल्या खिळ्यांमुळे फुटले. मोटारीत व्यावसायिकाची पत्नी, सहा वर्षाचा मुलगा आणि सहा महिन्याची मुलगी होती. मोटार काही अंतर पुढे जाऊन थांबल्यानंतर हातात धारदार हत्यारे घेतलेले पाच ते सहा जण समृध्दी महामार्गावर कठडे ओलांडून मोटारीकडे धावत येत असल्याचे मोटारीतून खाली उतरलेल्या व्यावसायिकाला दिसले. चार जण समोरुन आले. त्यापैकी दोघांनी चालकाला धरले आणि दोघे व्यावसायिकाच्या दिशेने येऊ लागले. धोका पाहून व्यावसायिकाने स्वत:कडे असलेल्या परवानाधारक बंदुकीूतने हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे लुटारु पळून गेले. त्यानंतर पाठीमागून आलेल्या वावी पोलिसांनी सर्व माहिती घेतली.

समृध्दी महामार्गावर त्याच रात्री तीन ते चार लुटमारीच्या घटना आणि लुटमारीचे प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येते. या घटनांमुळे समृध्दी महामार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनी आता स्वत:च्या सुरक्षेची काळजी स्वत:च करावी काय, असा प्रश्न करण्यात येत आहे. समृध्दी महामार्गावर एखादे वाहन थांबल्यास १० ते १५ मिनिटात पोलिसांचे वाहन त्याठिकाणी नेमके काय झाले, याची विचारणा करण्यासाठी येण्याची गरज असल्याचे वाहनधारकांचे मत आहे.