नाशिक – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत सीसीटीव्हीच्या कामासाठी ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान सिन्नर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज (आंतरमार्गिका बदल) या दरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

महामार्ग पोलिसांकडून प्राप्त परवानगीनुसार, ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर रोजी सिन्नर इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंजदरम्यान दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत मुंबई दिशेने, तर दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत नागपूर दिशेने वाहतूक बंद राहील. तसेच ४, ५ आणि ७ सप्टेंबर रोजी भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंजदरम्यान दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत मुंबई दिशेने, तर दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत नागपूर दिशेने वाहतूक बंद राहील.

‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे हे काम दोन वेगवेगळ्या टप्प्यांत पार पडेल आणि वेळापत्रकानुसार संबंधित दिशेची वाहतूक दररोज एका तासासाठी बंद राहील. समृद्धी महामार्गावरील सर्व प्रवाशांनी उपरोक्त कालावधीत प्रवासाचे पुरेसे नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे. या काळात वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

आयटीएमएस प्रणाली काय आहे ?

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी, वाहतूक शिस्त आणण्यासाठी आणि सुरक्षेसाठी सुरू केलेला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा हा अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्प मानला जातो. एमएसआरडीसीने हा प्रकल्प मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या दोन मोठ्या प्रकल्पांवर कार्यान्वित केला आहे. ही प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित असून, त्यात महामार्गावर ठिकठिकाणी हाय-डेफिनिशन कॅमेरे, सेन्सर्स आणि नियंत्रण कक्षांचे नेटवर्क जोडलेले असते. समृद्धी महामार्गावरही दर एक किलोमीटरवर दिवस आणि रात्री स्पष्ट दिसणारे कॅमेरे बसवले जात आहेत. या माध्यमातून १७ हून अधिक वाहतूक नियमांच्या उल्लंघनांवर नजर ठेवली जाते. वेगमर्यादा ओलांडणे, चुकीच्या लेनमधून गाडी चालवणे, बेकायदेशीर पार्किंग, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे, सीट बेल्ट न लावणे आदी १७ प्रकारच्या चुका ही प्रणाली स्वयंचलितपणे शोधून काढते. नियम मोडल्यास थेट महामार्ग पोलिस आणि आरटीओच्या मदतीने ऑनलाइन दंड पाठवला जातो.