नाशिक – देशात सुमारे २,८४३ किमीचे उच्च-क्षमतेचे समर्पित रेल्वे मालवाहतूक नेटवर्क तयार करणाऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्समध्ये तिसरा नवीन कॉरिडॉर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला समांतर जोडण्याची व्यवहार्यता रेल्वेकडून तपासली जात आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची रेल्वे मालवाहतूक नेटवर्कशी संलग्नता झाल्यास देशातील मालवाहतुकीला नवीन आयाम मिळणार आहे.
‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स’ भारतातील मालवाहतूक क्षेत्रात एक क्रांतिकारी परिवर्तन ठरले आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात भारतातील मालवाहतूक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडून आले आहेत. देशातील प्रमुख औद्योगिक, उत्पादन आणि लॉजिस्टिक्स केंद्रांदरम्यान उच्च-क्षमता असलेली, जलद, कार्यक्षम आणि विश्वसनीय रेल्वे मालवाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
सध्या या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर नेटवर्कमध्ये दोन प्रमुख मार्गांचा समावेश आहे. ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर सुमारे १,३३७ किमी लांबीचा असून, हा मार्ग पंजाबमधील ‘न्यू सहनेवाल’ येथून सुरू होतो आणि हरियाणा व उत्तर प्रदेशमार्गे बिहारमधील ‘न्यू सोननगर’ला जोडला जातो. तर वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर सुमारे १,५०६ किमी लांबीचा असून, तो उत्तर प्रदेशातील ‘न्यू दादरी’ येथून सुरू होतो आणि हरियाणा, राजस्थान व गुजरातमार्गे महाराष्ट्रातील ‘न्यू जेएनपीटी’पर्यंत जातो.
समृद्धी महामार्गाला समांतर जोडण्याची चाचपणी
या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशासाठी तिसऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचीही घोषणा करण्यात आली. हा मार्ग पश्चिम बंगालमधील ‘डानकुनी’ येथून सुरू होऊन झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रमार्गे गुजरातला जोडला जाईल. महाराष्ट्रामध्ये नवीन कॉरिडॉर समृद्धी महामार्गाला समांतर जोडण्याची व्यवहार्यतादेखील तपासली जात आहे.
मालाची जलद, अधिक कार्यक्षम वाहतूक
ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मिळून सुमारे २,८४३ किमीचे उच्च-क्षमतेचे समर्पित रेल्वे मालवाहतूक नेटवर्क तयार करतात. हे नेटवर्क देशातील प्रमुख औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रांना महत्त्वाच्या लॉजिस्टिक्स केंद्रांशी आणि बंदरांशी जोडून मालाची जलद, अखंड आणि अधिक कार्यक्षम वाहतूक करण्यास सक्षम करत आहे.
महत्त्वाच्या बंदरांशी जोडणी
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स नेटवर्कमुळे ‘डबल स्टॅक कंटेनर रेक्स’ देशातील महत्त्वाच्या बंदरांशी थेट जोडले जाऊ शकतात, ज्यामुळे मालवाहतुकीच्या पद्धतीत आणि स्थितीत मोठा बदल झाला आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्समुळे केवळ मालगाड्यांचा वेग आणि क्षमताच वाढली नाही, तर विद्यमान रेल्वे नेटवर्कवरील मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासही मदत झाली आहे. यामुळे प्रवासी गाड्यांच्या परिचालनासाठी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होते आणि देशाची लॉजिस्टिक्स कार्यक्षमता, पुरवठा साखळी व आर्थिक विकासाला चालना मिळते, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी म्हटले आहे. ईस्टर्न आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हे एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा म्हणून काम करत आहेत, ज्यामुळे भारताची मालवाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनत असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.
