नाशिक – शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत प्राण गमवावे लागलेल्या १० जणांचे दाखले देत, हे समोरच्यांनी केलेले खून असल्याचा आरोप करीत, या प्रकरणात मनपा आयुक्त आणि कुंभमेळामंत्री म्हणजे ‘चंपतराय’ यांच्याविरुद्ध ३०२ कलमान्वये गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी दिला. संपूर्ण जगात, देशात डांबर मिळत असताना नाशिकला डांबर मिळत नाही का, असा प्रश्न करीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झालेले खोदकाम आणि खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या विरोधात सोमवारी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) महानगरपालिका मुख्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. यावेळी मंत्री महाजन, नाशिकच्या महापौर, भाजप व शिवसेना (एकनाथ शिंदे) नगरसेवक तसेच मनपा प्रशासनाला लक्ष्य करण्यात आले. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत १० जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. काही नागरिक कोमात गेले किंवा अपंग झाले. या स्थितीला मनपा प्रशासनप्रमुख आणि कुंभमेळामंत्री यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी खा. राऊत यांनी केली.

अधिकाऱ्यांकडून नागरिकांना धमक्या

खड्ड्यांमुळे लहान मुलांना शाळेत पाठवताना पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेकडे तक्रारी करणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय अधिकारी धमकावतात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतले असून, त्यांनी एकदा शहराची अवस्था पाहायला हवी. त्यांच्या डांबराविषयीच्या विधानावर खा. राऊत यांनी आक्षेप घेतला. इराणमधील युद्धामुळे डांबर संपल्याचे सांगण्यात आले. ‘यांच्या फौजा तिथे लढायला गेल्या होत्या का? संपूर्ण जगाला, देशाला डांबर मिळते आणि नाशिकला मात्र डांबर मिळत नाही,’ अशी टीका त्यांनी केली.

कुंभमेळ्यात ‘व्हीआयपी शौचालयां’च्या नावाखाली भ्रष्टाचार

कुंभमेळ्याचा आराखडा १५ हजार कोटींवरून ४५ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगून, या प्रत्येक कामात मोठा भ्रष्टाचार व कमिशनखोरी होत असल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला. साधू-महंतांचेही तेच आक्षेप आहेत. ‘चंपतराय’ १० हजार ‘व्हीआयपी’ शौचालयांमध्येही पैसे खात आहेत, असा आरोप त्यांनी केला. ‘ज्या भाजपने अयोध्येत श्रीराम मंदिरातील दानपेट्या चोरल्या, दागिने चोरले, त्यांच्याकडून प्रति अयोध्या नाशिकमध्ये काय अपेक्षा करणार?’ असा प्रश्न त्यांनी केला. कुंभमेळामंत्री महाजन यांनी जावयाला दुसऱ्या कंपनीच्या बनावट नावाखाली २७ कोटी रुपयांची निविदा मिळवून दिल्याचा आरोप त्यांनी केला. कुंभमेळ्यात बनावट वर्क ऑर्डरद्वारे भ्रष्टाचाराचा ‘जामनेर पॅटर्न’ राबविला जात असून, कुंभमेळ्याचे हजारो कोटी कोणाच्या खिशात गेले, असा प्रश्न खा. राऊत यांनी केला.