नाशिक – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हाती घेण्यात आलेल्या नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात रिंग रोडच्या भूसंपादनावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. शेतकरी कुटुंबांना झालेल्या कथित मारहाणीवरून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाला असून, त्यांनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू असे सांगून दत्ता तिथून निघून गेले.

अधिकारी स्वतःच्या कार्यालयातून पळाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी भ्रमणध्वनीवरून दत्ता यांच्याशी संपर्क साधला. हाती दंडुका घेऊन महिलांना मारहाण करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा जाब विचारत राऊत यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.

​नाशिक रिंग रोडच्या भूसंपादनाचा विषय मातोरी, मुंगसरा भागात मोजणीवेळी झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बाधित शेतकरी व महिलांनी गुरुवारी नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. गेल्या शनिवारी मोजणीवेळी प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने घरात शिरून मारहाण केल्याची तक्रार त्यांनी केली. यासंदर्भातील चित्रफितीही दाखवण्यात आल्या.

शेतकऱ्यांना फरफटत घराबाहेर काढून पोलीस वाहनात डांबले आणि मुलांना जमिनीवर पाडून मारहाण केली, तसेच उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांनी स्वतः दंडुका घेऊन मारहाण केली, असे आरोप संबंधितांनी केले आहेत. त्यानंतर खासदार राऊत यांनी माजी आमदार वसंत गिते व अन्य पदाधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्याच्या सूचना दिल्या.

​त्यानुसार ठाकरे गटाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी दत्ता कार्यालयातच उपस्थित होते. आम्ही चर्चा करायला सुरुवात केल्यावर दत्ता हे जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन चर्चा करू असे सांगून कार्यालयातून निघून गेले. त्यांनी चर्चेतून पळ काढला, असा आरोप वसंत गिते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्याला नाशिकची भौगोलिक माहिती नाही, त्यांना मराठी येत नाही. त्यांनी महिलांवर आणि वृद्ध आजींवर हात टाकला, असा संतापही शिष्टमंडळाने व्यक्त केला.

​खासदार राऊतांनी फोनवर झापले…

​मातोरी, मुंगसरा भागात शेतकऱ्यांना झालेल्या कथित मारहाणीच्या चित्रफिती पाहिल्यानंतर खासदार राऊत यांनी उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून जाब विचारला. संबंधित अधिकाऱ्याने असे काहीच घडले नाही असे सांगताच राऊत यांनी चित्रफितीचा संदर्भ दिला. तुम्ही हातात दांडुका घेऊन महिलांना मारहाण कशी केली? हे तुमचे काम नाही. ८० वर्षीय वृद्धासह महिला आपल्या व्यथा मांडत आहेत. तुमच्या घरी आई, बहिणी आहेत ना? तुम्ही असे कसे करू शकता? हे कोणत्या नियमात बसते? अशा प्रश्नांची सरबत्ती करत राऊत यांनी दत्ता यांना धारेवर धरले. आम्ही भेट घेण्यासाठी कार्यालयात येत आहोत, असेही खासदार राऊत यांनी त्यांना ठणकावून सांगितले.