नाशिक : जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळताना शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी काही निवडक म्हणजे मोजक्याच लोकांना हाताशी धरून राजकारण केले. पक्षाचा नेता सर्व गटांना सांभाळत काम करतो. सर्वाशी चर्चा करतो. परंतु, राऊत यांचे काम व्यक्तिकेंद्रित होते. नाशिकला आल्यावर विविध घटकांशी चर्चा न करता, कुणाला विश्वासात न घेता ते काम करायचे, अशा शब्दांत नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांच्यावर टीका केली.

आमदारांपाठोपाठ शिवसेनेतील १२ खासदारांचा गट शिंदे गटात सहभागी झाला आहे. त्यात गोडसे यांचाही समावेश आहे. मंगळवारी १२ खासदारांच्या गटाने राहुल शेवाळे यांना शिवसेनेचे गटनेते म्हणून नियुक्त करण्याबाबत लोकसभा सभापतींना पत्र दिले. आमच्या गटाचे नाव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विचारांचे संघटन असे असल्याचे गोडसे यांनी सांगितले. शिंदे गटात सहभागी होणाऱ्या बहुतांश आमदारांनी संजय राऊत यांना लक्ष्य केले होते. त्याची पुनरावृत्ती खासदारांनी बंडखोरीचे निशाण फडकावल्यानंतर होत आहे. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि शिवसैनिकांची कुठलीही अडचण नव्हती. राऊत यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी होती. काही मोजक्या लोकांना हाताशी धरून त्यांचे राजकारण चालायचे. इतरांना ते विश्वासातही घेत नसत. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागूनही प्रतिसाद मिळाला नाही. अलीकडेच पक्षाच्या १६ खासदारांच्या बैठकीत भाजपशी नैसर्गिक युतीचा मुद्दा मांडला होता. संजय राऊत यांच्या बोलण्याने पक्षात आणखी फूट पडत असून त्यांना शांत करावे, असा आग्रह धरला गेला. शिवसेनेतून मोठय़ा संख्येने आमदार बाहेर जाताना राऊत यांचे नाव घेत होते. त्यांच्या व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा आपण जवळून अनुभव घेतला. राऊत यांनी भाजपशी असलेले वैयक्तिक हिशेब चुकते करण्यासाठी सेनेला वेठीस धरले, असा आरोपही गोडसे यांनी केला.

आजी-माजी आमदार, खासदारांना काँग्रेस, राष्ट्रवादीशी अनैसर्गिक आघाडी मान्य नव्हती. भाजपसोबत राहण्याचा सर्वाचा आग्रह होता. गेल्या आठ वर्षांत नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना संघटनात्मक आणि राजकीय संघर्षांत आपण कधी पडलो नाही. केवळ विकास कामे हेच ध्येय ठेवून काम केले. उर्वरित दोन वर्षांत नाशिकमध्ये मोठे प्रकल्प मार्गी लागावे म्हणून शिंदे गटाचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला. अर्थसंकल्पात नाशिकला मेट्रो निओ प्रकल्प मंजूर झालेला आहे. सुरत-चेन्नई महामार्ग, मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडॉर, नदी जोड प्रकल्प आदी विकास कामे व्हावेत यासाठी आपण उपरोक्त निर्णय घेतल्याचे गोडसे यांनी सांगितले.