जळगाव : महिला उमेदवार नवनीत राणा यांच्याबद्दल  संजय राऊत इतक्या आक्षेपार्ह आणि अर्वाच्च पद्धतीने बोलले की बोलू शकत नाही. त्यांनी फक्त आता शिव्या द्यायचे बाकी ठेवले आहे. एवढ्या खालच्या पातळीवर ते बोलले. त्यांच्याबद्दल बोलून आम्हाला तोंड खराब करायचे नाही आणि बोलायचेसुद्धा नाही. त्यांचा तोल ढासळत चालला आहे, अशी टीका भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

महायुतीतर्फे जळगावच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेरच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांचे गुरुवारी अर्ज भरण्यात आले. तत्पूर्वी मंत्री महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडतानाच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजपप्रवेशावरही महाजन यांनी भाष्य केले. एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांनी स्वतः सांगितले आहे की, ते थेट नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा यांच्याशीच चर्चा करतात. त्यामुळे माझ्या परवानगीचा प्रश्‍नच येत नाही, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> रक्षा खडसे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार – एकनाथ खडसे यांचे सूतोवाच

रक्षा खडसेंना एकनाथ खडसेंनी आशीर्वाद दिल्यावरून मंत्री महाजन यांनी, रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे हे एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे आपण ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतो, तसे रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले आहेत, असे नमूद केले.