जळगाव : मराठी संगीत विश्वात सध्या नव्या ट्रेंडची जोरदार लाट उसळलेली दिसत असून संजू राठोडचे ‘लाल लाल कलरची बांगडी’ हे गाणे सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. काही सेकंदांच्या व्हिडिओंपासून ते प्रोफेशनल डान्स कव्हर्सपर्यंत सर्वच प्रकारच्या कंटेंटमध्ये हे गाणे झळकत आहे. २०२६ मधील नव्या मराठी गाण्यांमध्ये तसेच डीजे पार्टी गाण्यांच्या यादीत या गाण्याने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले असून, तरुणाईच्या प्ले लिस्टमध्ये ते अग्रस्थानी आहे.

जळगाव जिल्ह्यातील धानवड तांडा या छोट्याशा खेड्यातून आलेल्या संजू राठोड या कलाकाराने आपल्या मातीशी असलेले नाते कायम जपले आहे. संजूची एक खास ओळख म्हणजे त्याच्या गाण्यांमधून ग्रामीण जीवनाचे वास्तव आणि सौंदर्य प्रभावीपणे मांडलेले असते. ‘लाल लाल कलरची बांगडी’ या गाण्याचे चित्रीकरणही गाव-खेड्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले असून, कौलारू घरे, मातीचे रस्ते,, गुरेढोरे आणि गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन या सर्व घटकांमुळे गाण्याला अस्सल ग्रामीण स्पर्श मिळाला आहे. आधुनिक बीट्स आणि पारंपरिक वातावरण यांचा साधलेला सुरेख मेळ हे या गाण्याचे मोठे वैशिष्ट्य ठरले आहे. याआधी गुलाबी साडी तसेच शेकी या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेल्या संजू राठोडने या वेळी आणखी दमदार आणि ठेका धरायला लावणारे सादरीकरण केले आहे.

‘लाल लाल कलरची बांगडी’ या गाण्याची खासियत म्हणजे कॅची बीट, साधे पण लक्षात राहणारे शब्द आणि त्यावर बसवलेल्या सुंदर डान्स स्टेप्स. त्यामुळे हे गाणे ऐकताच पाय आपोआप थिरकू लागतात, अशी प्रतिक्रिया तरुण-तरुणींकडून मिळत आहे. या गाण्यात अभिनेत्री ईशा मालवीय हिची उपस्थिती पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून, तिच्या स्टाइल आणि एक्सप्रेशन्समुळे गाण्याला अधिक ग्लॅमर मिळाले आहे. हे गाणे दोन आठवड्यांपूर्वी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आणि काहीच दिवसांत करोडो व्ह्यूजचा टप्पा पार करत व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर अनेक इन्फ्लुएन्सर्स, डान्सर्स तसेच सर्वसामान्य युजर्स या गाण्यावर व्हिडिओ तयार करत आहेत. विशेष म्हणजे, गावाकडील तरुणांसोबतच शहरातील युवक-युवतींनीही या गाण्याला तितकाच प्रतिसाद दिला आहे.

लग्नसमारंभ, कॉलेज फेस्ट, डीजे नाइट्स आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हे गाणे मोठ्या उत्साहात वाजवले जात आहे. गाण्याच्या व्हिडिओची रंगसंगती, आधुनिक आणि पारंपरिक वेशभूषा तसेच नृत्य रचना या सर्व बाबी प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. ‘लाल लाल कलरची बांगडी’ या शीर्षकातूनच ग्रामीण प्रेमकथेला एक हलकाफुलका, रंगतदार स्पर्श मिळतो. गाण्यातील संवाद आणि दृश्यरचना प्रेक्षकांना आपल्या गावची आठवण करून देतात. त्यामुळे हे गाणे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहत नाही, तर भावनिक पातळीवरही जोड निर्माण करते.

मराठी संगीत सृष्टीत सध्या लोकसंगीत आणि आधुनिक बीट्स यांचा संगम मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत संजू राठोडसारखे कलाकार आपल्या वेगळ्या शैलीतून नव्या पिढीला आकर्षित करत आहेत. ‘लाल लाल कलरची बांगडी’ या गाण्याच्या यशामुळे मराठी संगीताला पुन्हा एकदा व्यापक प्रेक्षकवर्ग मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गाण्याच्या यशानंतर संजू राठोडकडून आणखी नवे आणि हटके प्रयोग पाहायला मिळतील, अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.