नाशिक – अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री संत माऊली सहकारी क्रेडिट सोसायटीतील चार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधाराला जेरबंद करताना नाट्यमय घडामोडी घडल्या. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी इमारतीच्या गॅलरीबाहेरील डक्टमध्ये लपला. अटक केल्यास डक्टवरून उडी मारून जीव देण्याची धमकी त्याने दिली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी आरोपीला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
सुनील बाबासाहेब शिरसाठ असे संशयिताचे नाव असून, तो अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील श्री संत माऊली सहकारी क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेचा अध्यक्ष आहे. संशयित शिरसाठ आणि संचालक मंडळाने जाहिरात व इतर माध्यमांतून नागरिकांना पतसंस्थेत बचत खाते उघडण्यासह मुदत ठेवींवर जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून पैसे भरण्यास भाग पाडले. त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देत ठेवींची रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. काहींनी पतसंस्थेतून सोनेतारण कर्ज घेतले होते. त्यांचे दागिने परत न करता त्यांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी श्री संत माऊली सहकारी क्रेडिट सोसायटी, पाथर्डी शाखेचे अध्यक्ष सुनील शिरसाठ, बाबासाहेब शिरसाठ, संचालक मंडळ, अंबादास आव्हाड, आनंद सानप, शरद मरकड, छाया बोरुडे, आबासाहेब गिरी यांच्यासह ११ जणांविरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सुनील शिरसाठ फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेने नाशिक शहर पोलिसांना कळवले होते. त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेच्या नाशिकरोड युनिटला आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, संशयित सुनील शिरसाठ हा आढाव पेट्रोलपंपाजवळ असलेल्या त्याच्या सासऱ्याच्या घरी असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. नाशिकरोड युनिटचे प्रभारी संदीप पवार यांनी पथकासह आव्हाड पेट्रोलपंपाजवळ धडक देत आरोपीच्या सासऱ्याचे घर शोधले.
काय घडले?
आरोपीला जेरबंद करताना पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी सुनील शिरसाठ गॅलरीबाहेरील डक्टमध्ये लपला. पोलीस तिथे पोहोचताच तो आक्रमक झाला. मला अटक केल्यास डक्टवरून खाली उडी मारेन, अशी धमकी त्याने दिली. पोलिसांनी आरोपीला शांत करून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यामुळे तातडीने नाशिकरोड अग्निशमन दलाच्या पथकाला बोलावण्यात आले.
पोलीस पथकातील हवालदार अविनाश देवरे, शिपाई केतन सोनवणे आणि कुणाल घोरपडे यांनी एका बाजूने शिडी लावून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूने पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, शिपाई सुशांत दिघे, समाधान जाधव आणि भरत राऊत यांनी गॅलरीच्या खिडकीतून शिताफीने मागून त्याला पकडले. पोलीस पथकाने धाडसी कारवाई करत आरोपी सुनील शिरसाठला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
