नाशिक: संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी पालखी सोहळ्यास सोमवारी प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी बांधव व भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाचे नियोजन पूर्णत्वास गेले आहे. कुंभमेळा कामांमुळे वारी त्र्यंबक शहरातून बाहेर पडण्याचा मार्ग बदलला असतांना नाशिक ते त्र्यंबक रस्त्यावर सुरू असलेली रस्त्याची कामे, वारीमुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा आदींचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
त्र्यंबकेश्वर येथून श्री संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळा सोमवारी सुरू होईल. मजल दरमजल करत ही पालखी आषाढी एकादशीच्या पूर्वसंंध्येला पंढरपूर येथे पोहचणार आहे. शासनाकडून वारकऱ्यांना सर्वोत्तम सोयी सुविधा व व्यवस्था दिल्या जातील, असे सांगितले जाते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस विभाग, जिल्हा परिषदसह अन्य विभागांना सुचना दिल्या.
शासनाच्यावतीने पालखी मुक्कामाच्या गावाला प्रत्येकी तीन लाख रुपये निधी देण्यात येणार आहे. वारी काळात वारकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शुद्ध, स्वच्छ पिण्याचे पाणी वीस हजार लिटर क्षमतेचे १० टँकर, परतीच्या प्रवासासाठी तीन टँकरचे नियोजन आहे. वारी सुरू असतांना भजन, अभंग, कीर्तन आदीसाठी ध्वनी व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळा असल्याने मुक्कामाच्या गावी जलरोधक तंबू उभारण्यात येईल.
महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र स्नानगृहासह फिरती शौचालये, पाणी आदी व्यवस्था करण्यात येईल. विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत निर्मळ वारी व्हावी, यासाठी नियोजन केल्याची माहिती संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. राहुल महाराज साळुंके यांनी दिली.
आरोग्य पथके, रुग्णवाहिका, दिंड्यांना गॅस सिलिंडर
वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दोन आरोग्य पथके, डॉक्टर्स, परिचारिका, मोफत गोळ्या-औषधे, रुग्णवाहिका व उपचार सुविधा उपलब्ध केल्या जातील. वारी मार्गावरील सर्व रुग्णालये वारकऱ्यांसाठी खुले ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. वारीत रथाचे सारथ्य करणाऱ्या बैल जोडीसाठी पशूवैद्यकीय अधिकारी असतील. पालखी सोहळ्यातील सर्व दिंड्यांना गॅस सिलिंडर पुरवठा करण्यात येणार आहे. वाहनांना तात्काळ डिझेल, पेट्रोल, सीएनजी उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली. पायी वारीस सुरूवात झाल्यावर त्र्यंबकेश्वर ते नाशिक संपूर्ण रस्ता एका बाजूने पालखी सोहळ्यासाठी खुला करून दिला जाणार आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज राहील. अन्न प्रशासनाच्या माध्यमातून अन्नाची तपासणी होणार आहे.
