नाशिक: महाराष्ट्रातील सर्वांनाच आता पंढरपूरच्या आषाढी वारीचे वेध लागले आहेत. वारीतून कधी एकदा पंढरपूरला जातो, आणि सावळ्या विठूरायाचे दर्शन घेतो, असे वारकऱ्यांना झाले आहे. त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी पालखी सोहळा २९ जून रोजी पंढरपूरसाठी प्रस्थान करणार आहे. यावेळी सर्वच वारकऱ्यांचे लक्ष एका बैलजोडीवर राहणार आहे. वारकऱ्यांच्यादृष्टीने या बैलजोडीचेही विशेष महत्व आहे. या बैलजोडीवर मोठी जबाबदारी असते. आणि विशेष म्हणजे, ही बैलजोडी ज्यांच्या मालकीची आहे, त्यांनाही आपल्या बैलजोडीवर विशेष जबाबदारी टाकल्याचा अभिमान आहे.

त्र्यंबकेश्वर येथून श्री संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळा सोमवारी निघाल्यानंतर आषाढी एकादशीच्या पूर्वसंंध्येला पंढरपूर येथे पोहचणार आहे. वारी काळात वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २० हजार लिटर क्षमतेचे १० टँकर, परतीच्या प्रवासासाठी तीन टँकर पालखीबरोबर राहतील. पावसाळा असल्याने मुक्कामाच्या ठिकाणी जलरोधक तंबू उभारण्यात येईल. स्नानगृहासह फिरती शौचालये, आरोग्य व्यवस्था, असे सर्वकाही राहणार आहे.

संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाल्यावर पालखीसाठी बैलजोडीची निवड केली जाते. त्यासाठी एक विशेष प्रक्रिया राबवली जाते. श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांनच्या वतीने प्रतिवर्षी बैलजोडीसाठी अर्ज मागितले जातात. त्यातून योग्य बैलजोडीची निवड केली जाते. पालखी सोहळ्यात बैलजोडीचा मान एक महत्वाचा विषय असतो. शेतकरी श्रद्धापूरक अंतःकरणाने आणि सेवा भावनेने बैलजोडीची सेवा करून संपूर्ण पावित्र्य सांभाळून पालखी रथासाठी बैल जुंपत असतात. गावोगावी पालखी रथाबरोबर बैलजोडीचेही पूजन केले जाते. एकूण ४५ दिवसांच्या संपूर्ण पायी प्रवासामध्ये बैलांची काळजी घेणे, त्यांना चारा-पाणी करणे, त्यांची निगा राखणे, त्यांना दररोज रथासाठी सजविणे ही एक मोठी सेवा मानली जाते.

यावर्षी श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंके, विश्वस्त कांचनताई जगताप, नारायणदादा मुठाळ तसेच विश्वस्त मंडळ आणि संस्थान कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बैलजोडी पाहणी झाली. आणि सर्वांनुमते इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येतील शेतकरी गजराम पुंजा मते तसेच सिन्नर तालुक्यातील सुरेगाव येथील संपत भालेराव यांच्या बैलजोडीची निवड वारीसाठी करण्यात आली. ज्या बैलजोडीची निवड झाली त्या बैलजोडींचे मालक आणि सेवा देणारे यांचे बैलजोडी निवड प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीची निवड झालेले शेतकरी गजराम मते यांच्या कुटूंबियांनी आनंद व्यक्त केला.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर यादरम्यान होणाऱ्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात संत निवृत्तीनाथ संस्थानच्या माध्यमातून पालखी सोहळ्याला असणाऱ्या बैलजोडीच्या निमित्ताने आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली, याचा आम्हाला मोठा अभिमान आहे. या सुवर्णसंधीचा लाभ आमच्या कुटुंबीयांना या मुक्या प्राण्यांमुळे मिळाला. संतांच्या पादुका पंढरपूरपर्यंत घेऊन जाण्याचे भाग्य यानिमित्ताने आमच्या घराण्याला मिळाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.