नाशिक – रविवारी सकाळी सातपूर येथून शहरात दाखल झालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे महापालिका, सार्वजनिक मंडळ आणि नागरिकांतर्फे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. संत निवृत्तिनाथ पालखी सोहळा स्वागतासाठी महानगरपालिकेकडून यापुढे तीन लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्ण गमे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी महानगरपालिकेतर्फे संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले. पंचायत समिती कार्यालय प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक गमे, अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, माजी आमदार बाळासाहेब सानप आदी उपस्थित होते. पालखी मार्गावर रांगोळी व आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. परिसर वारकऱ्यांनी फुलून गेला होता. यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा स्वागत समितीतर्फे गमे, बानायत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गमे यांनी यापुढे संत निवृत्तिनाथ पालखी सोहळा स्वागतासाठी मनपाकडून तीन लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असे जाहीर केले. व्यासपीठावर श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे-पाटील, सचिव सोमनाथ घोटेकर, पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ, महंत भक्तीचरणदास, भाऊसाहेब गंभीरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा – नाशिक : आयमाच्या वार्षिक सभेत सर्व विषय मंजूर

प्रशासनाकडून पालखीचे स्वागत झाल्यानंतर पुढे त्र्यंबक रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावासमोरही मनपातर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले. येथे मंडप उभारण्यात आला होता. शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. त्यानंतर दिंडी मालक मोहन बेलापूरकर, दिंडी चालक बाळकृष्ण डावरे, निवृत्ती महाराज पालखी सोहळा स्वागत समितीचे कार्याध्यक्ष नरहरी उगलमुगले, समितीचे सल्लागार मोहनराव जाधव, राहुल बर्वे आदींना गुलाब पुष्प देऊन वंजारी यांनी स्वागत केले. यावेळी मनपाच्या पंचवटीमधील इंदिरा गांधी रुग्णालयातील पथकाने वारकऱ्यांना आरोग्य सेवा दिली. पिण्याचे पाणी पुरविण्यात आले. वारकऱ्यांना अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली होती.

हेही वाचा – नंदूरबार, धुळे, नाशिकला हवामान विभागाचा इशारा; दुपारनंतर वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता

रामकृष्ण हरी, माऊली, माऊली असा जयघोष करीत पालखी मार्गस्थ झाली. मार्गात ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करून नागरिकांनी दर्शन घेतले. रविवारी सायंकाळी पालखीचा पंचवटीतील आयुर्वेद रुग्णालयासमोरील गणेशवाडी येथे मुक्काम राहणार आहे. सोमवारी सकाळी नाशिकरोडच्या मुक्तिधाम येथून ती मार्गस्थ होणार असल्याचे आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकात नमूद आहे.

More Stories onनाशिकNashik
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant nivruttinath palkhi welcomed enthusiastically by nashik people ssb
First published on: 04-06-2023 at 17:12 IST