संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानला देणगी

या निधीचा उपयोग निवृत्तीनाथ महाराजांच्या चांदीच्या रथासाठी करण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानला अलीकडेच देणगीतून दोन लाख ८४ हजार रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड यांनी दिली. या निधीचा उपयोग निवृत्तीनाथ महाराजांच्या चांदीच्या रथासाठी करण्यात येणार आहे. जूनमध्ये झालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळ्याच्या खर्चातून शिल्लक राहिलेले एक लाख ३४ हजार रुपये चांदीच्या रथासाठी देण्याचा निर्णय समाधी सोहळा समितीने आधीच घेतला आहे. तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत यांनी त्यांच्या मातोश्री नर्मदाबाई यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपयांची देणगी दिली. रामकृष्णदास महाराज ट्रस्टतर्फे ५१ हजार रुपये याप्रमाणे एकत्रित दोन लाख ८४ हजारांची देणगी संस्थानकडे प्राप्त झाली आहे, असे गायकवाड यांनी नमूद केले. निवृत्तीनाथांच्या प्रस्तावित चांदीच्या रथासाठी आतापर्यंत एकूण ४० लाख रुपये जमा झाले आहेत. रथासाठीचा एकूण खर्च ७५ लाख रुपये आहे. येत्या पौष वारीपर्यंत रथाचे काम पूर्ण होण्याची शक्यता असून त्यासाठी अजून ३५ लाख रुपयांची गरज आहे. येत्या पौष वारीसाठी १५ जानेवारीला हा रथ संस्थानला मिळणार आहे. पौष वारी ४ फेब्रुवारी रोजी असल्याची माहिती संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे विश्वस्त पुंडलिक थेटे यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sant nivruttinath samadhi trust donation

ताज्या बातम्या