नाशिक – लैंगिक शोषण तसेच लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल साळुंखे यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळुंखे फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी अन्य जिल्ह्यांमध्ये पथके पाठविली आहेत. या पार्श्वभूमीवर, संत निवृत्तीनाथ देवस्थान काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानच्या अध्यक्षपदाची सूत्रे साळुंखे यांनी सुमारे सात महिन्यांपूर्वी स्वीकारली. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूर येथे देवस्थानच्यावतीने पायी पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. संत निवृत्तीनाथ यांचे साहित्य प्रकाशन तसेच आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने देवस्थानच्या वतीने काय करता येईल, याबाबत सुरू असलेल्या नियोजनातही ते सक्रिय होते. मात्र, वैयक्तिक आयुष्यात महिलांशी असलेला त्यांचा संपर्क कायम चर्चेत राहिला.
तक्रारदार विवाहित महिलेचे साळुंखे यांच्याशी मागील काही वर्षांपासून संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. लग्नाचे आमिष दाखवून साळुंखे याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून साळुंखे तिच्याशी संपर्क टाळत होते. लग्नाबाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता साळुंखे यांनी मारहाण केल्याची तक्रार महिलेने केली आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून संबंधित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात साळुंखे यांच्याविरुद्ध शारीरिक शोषण तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी सांगितले की, या प्रकरणात संशयित साळुंखे याला अटक झालेली नाही. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार असून, त्याच्या शोधासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.
संत निवृत्तीनाथ देवस्थानची भूमिका महत्त्वाची
वारकऱ्यांचे श्रद्धास्थान तसेच ‘प्रति पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत निवृत्तीनाथ देवस्थानच्या अध्यक्षांविरुद्ध महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या वतीने विश्वस्तांची तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत अध्यक्ष साळुंखे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार असून, प्रभारी अध्यक्षाची नियुक्ती करण्याबाबतही चर्चा होणार आहे. याबाबत विश्वस्त अमर ठोंबरे यांनी सांगितले की, संबंधित महिलेने यापूर्वीच संस्थानच्या विश्वस्तांना या प्रकरणाची माहिती दिली होती. मात्र, काही विश्वस्तांनी टाळाटाळ करून विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. महिलेने मारहाणीच्या चित्रफितीही विश्वस्तांना दिल्या होत्या. विश्वस्तांमधील बेबनावाचा फायदा साळुंखे यांनी घेतल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला.
