नाशिक – उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या कळवण तालुक्यातील श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ नियुक्तीला उच्च न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या ई-मेलनुसार नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

ट्रस्टच्या संकेतस्थळावरून नवनियुक्त विश्वस्त निवडीची यादी मागे घेण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या निवड प्रक्रियेवर पात्र व अपात्र ठरलेल्या काहींनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर ही स्थगिती देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

​कळवण येथील श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात पाच सदस्यांच्या नियुक्तीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयामार्फत निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार पाच वर्षांच्या कालावधीसाठी ॲड. राहुल खुटाडे (गंगापूर रोड, नाशिक), विष्णू वारुंगसे (गोविंदनगर, नाशिक), डॉ. राजेंद्र वराडे (नाशिकरोड), दिलीपकुमार देशमुख (कळवण) आणि डॉ. कांचन देसले (गंगापूर रोड, नाशिक) या विश्वस्तांची निवड जाहीर करण्यात आली होती.

सप्टेंबर २०२५ मध्ये विश्वस्त निवडीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या पदांसाठी मोठ्या संख्येने अर्ज आले. कागदपत्रांच्या छाननी प्रक्रियेअंती ३०९ उमेदवार पात्र ठरले, तर कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे ३१६ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले. पात्र उमेदवारांमध्ये विश्वस्त मंडळातील सदस्यांसह अनेक दिग्गजांचा समावेश होता, तर अपात्र ठरलेल्यांमध्ये डॉक्टर व वकील मंडळी होती. विश्वस्त निवडीकरिता १२ मार्च रोजी पात्र सदस्यांची मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीनंतर त्याच दिवशी सायंकाळी नव्या विश्वस्तांची नावे जाहीर करण्यात आली होती.

​या निवड प्रक्रियेवर काहींनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयाकडे तक्रारी केल्या. यात पात्र व अपात्र उमेदवारांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाला ई-मेलद्वारे सूचना केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाकडून प्राप्त ई-मेलच्या अनुषंगाने श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ निवडीची प्रसिद्ध करण्यात आलेली यादी संकेतस्थळावरून मागे घेतली जात आहे.

उच्च न्यायालयाच्या पुढील निर्देशांपर्यंत ती स्थगित ठेवण्यात आल्याचे जिल्हा व सत्र न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या संदर्भातील पत्र श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दरम्यान, एका विशिष्ट कुटुंबात वारंवार विश्वस्तपद जात असल्याचा काही उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. यापूर्वी दोन वेळा विश्वस्त राहिलेल्यांची पुन्हा निवड झाली, तसेच त्यांच्या एका नातलगाची विश्वस्त म्हणून निवड झाल्याकडे काहींनी लक्ष वेधले होते.