नाशिक : संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंग गड येथील सप्तश्रृंगी देवीचा आश्विन नवरात्रोत्सवाची विश्वस्थांमार्फत जय्यत तयारी सुरु असून कोजागिरी पौणिमा उत्सवाचीही उत्साहात आणि विविध धार्मीकि विधीनुसार तयारी करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाच्या वतीने गडावर येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पूरेपूर खबरदारी घेण्यात येत आहे. सप्तश्रृंग गडावर आश्विन नवरात्रोत्सव यात्रा कालावधीत गडावर होणारी गर्दी लक्षात घेता खासगी वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे.
नाशिक शहरापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर वणीजवळील नांदुरी या पायथ्याच्या गावाजवळून सप्तश्रृंग गडावर जाता येते. गडावर साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखली जाणारी सप्तशृंगी देवी विराजमान आहे. सह्याद्रीच्या पठारावरील गडाच्या कडेकपारीत देवीचे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन असून समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार ५६९ फूट उंचीवर आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून सप्तश्रृंग गडावर भाविक येत असतात. गडावर थेटपर्यंत वाहने जात असल्याने भाविकांची चांगली सोय झाली आहे. अनेक भाविक वाहनांऐवजी गडावर पायी जाणे पसंत करतात. ज्येष्ठ व्यक्ती, महिला यांना आधुनिक फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या माध्यमातून काही मिनिटात थेट मंदिरापर्यंत जाता येत असल्याने त्यांनाही देवीचे दर्शन अल्पावधीत घेता येणे शक्य झाले आहे.
सप्तशृंगी गडाच्या बाजूला शिवतीर्थ शितकडा गणपती मंदिर, गुरुदेव आश्रम, सूर्यकुंड, कालिका कुंड जलगुफा आदी ठिकाणे आहेत. यावर्षी आश्विन नवरात्रोत्सव ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. १९ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता गडाच्या शिखरावर फडकविण्यात येणाऱ्या कीर्ती ध्वजाजी मिरवणूक निघेल.
कोजागिरी पौर्णिमा उत्सव २५ ते २६ ऑक्टोबर या दोन दिवशी होईल. दरम्यान देवीची पंचामृत महापूजा, घटस्थापना, ललिता पंचमी, दुर्गाष्टमी, होम हवन, तसेच कोजगिरी पौर्णिमेनिमित्त कावडीने आणलेले पाणी घेण्याची वेळ आणि जलाभिषेक महापूजा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होईल.नवरात्र उत्सवात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने गडावर तसेच घाटमार्गात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ऑक्टोबरच्या रात्री १२ वाजेपासून ते २६ ऑक्टोबरच्या १२ वाजेपर्यंत नांदुरी ते सप्तश्रृंग गड घाट रस्ता खासगी वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
यादरम्यान १५० बसेस भाविकांची ने-आण करतील. त्यामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही. नवरात्र उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्वस्त संस्थेतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. धार्मिक विधी आणीि कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्यां संख्येने उपस्थित राहावे. पुढील वर्षी होणाऱ्या सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गडावर होणाऱ्या नवरात्रोत्सवाकडे तयारीच्या दृष्टीने व्यवस्थापन आणि प्रशासनाकडून पाहिले जात आहे.
