scorecardresearch

सप्तश्रृंगी देवीचे मंदिर ४५ दिवस बंद ; अंतर्गत सजावटीसह विविध कामे

या ४५ दिवसांच्या काळात श्री भगवती स्वरूप मूर्तीचे संवर्धन आणि देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरू करण्यात आले आहे.

सप्तश्रृंगी देवीचे मंदिर ४५ दिवस बंद ; अंतर्गत सजावटीसह विविध कामे

वणी : सप्तश्रृंगी गडावरील देवी मंदिरात विविध कामे करण्यासाठी २१ जुलैपासून सप्तश्रृंगी देवी मंदिर ४५ दिवस बंद राहणार असल्याची माहिती सप्तश्रृंगीनिवासिनी विश्वस्त संस्थेकडून देण्यात आली आहे.

सोमवारी दुपारी ढगफुटीसदृश पावसात मंदिराच्या एका पायरी मार्गावर माती आणि पाण्याचा लोंढा आला होता. त्यात पाच भाविक जखमी झाले. ही दुर्घटना आणि मंदिर बंद ठेवणे याचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले जाते. मंदिराची अंतर्गत सजावट, भविष्यात येणाऱ्या आव्हानांना कसे तोंड देता येईल याकरिता आधुनिकीकरण आणि हे करताना त्याची तांत्रिक बाजू बघून त्यानुसार प्रक्रिया करण्याचा विश्वस्त संस्थेचा मानस आहे. या अनुषंगाने बुधवारी सकाळी गडावर विश्वस्त मंडळ अध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी, सदस्य, व्यवस्थापक, पुरोहित, तांत्रिक समितीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात या विषयांवर सर्वंकष चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. या कामांसाठी ४५ दिवस केवळ मंदिर बंद असेल. येणाऱ्या भाविकांना पहिल्या पायरीवर नतमस्तक होता येणार आहे. विश्वस्त संस्थेच्या वतीने पहिल्या पायरीवर उपकार्यालयालगत श्री भगवतीची हुबेहूब प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून ठेवली जाणार आहे. तसेच भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद, भक्त निवास आणि इतर आनुषंगिक सुविधा नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील, असेही मंदिर संस्थानने कळविले आहे. या ४५ दिवसांच्या काळात श्री भगवती स्वरूप मूर्तीचे संवर्धन आणि देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरू करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत कार्यरत अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाने शासनाचा पुरातत्त्व विभाग, आयआयटी पवई यांच्यासह खासगी संस्थेतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून ही कामे करण्यात येणार आहेत. गाभाऱ्यातील गळती थांबविण्यासाठीच्या उपाययोजना, देवी गाभारा चांदीने सजविणे, गाभारा सुशोभीकरण, दर्शन रांग आणि फेनिक्युलर ट्रॉलीने येणाऱ्या भाविकांचे दर्शन यासाठी वेगवेगळी व्यवस्था करणे यासाठी काही प्राथमिक कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

Nashik News (नाशिक / उत्तर महाराष्ट्र न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-07-2022 at 10:32 IST

संबंधित बातम्या