नाशिक – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या मंदिरात नक्षीकामातील सुमारे २२ किलो चांदीत तफावत आढळल्याच्या तक्रारीची चौकशी करावी, असे जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयाने अनुक्रमे कळवणचे उपविभागीय अधिकारी तसेच नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्राद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगी गडावरील मंदिरातील नक्षीकामातील सुमारे २२ किलो चांदीबाबत सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी तक्रार केली होती. द्यानद्यान आणि विधिज्ञ सुरेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सामाजिक कार्यकर्ते छगन जाधव, माजी सरपंच बेबीताई जाीधव यांनी जानेवारीपासून आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले.
द्यानद्यान यांच्या तक्रारीनुसार मंदिरातील नक्षीकामासाठी पूर्वीच्या नोंदीनुसार सुमारे ४०६ किलो चांदी वापरलेली असताना, प्रत्यक्ष मोजणीत केवळ ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदी आढळली. त्यामुळे २२ किलो ४९० ग्रॅम चांदीची तफावत समोर आली असून अपहाराचा संशय व्यक्त करण्यात आला.
ट्रस्टच्या तत्कालीन व्यवस्थापकांनी चौकशी समितीसमोर दिलेल्या खुलाशात चांदी काढताना पंचनामा, वजन आणि सीलबंद प्रक्रिया नियमांनुसार झाली नसल्याचे नमूद केल्याने संशय अधिक गडद झाला आहे. या प्रकरणात दोषी विश्वस्त व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन अपहार झालेली चांदीची रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी करण्यात आली.
या प्रकरणात माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागविण्यात आली असता ट्रस्टने “आम्हाला माहिती अधिकार कायदा लागू नाही” असे उत्तर देत माहिती नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर प्रथम अपील दाखल करूनही कार्यवाही न झाल्याने राज्य माहिती आयोग, नाशिक खंडपीठाकडे तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यानच्या काळात द्यानद्यान यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडे इ मेलद्वारे तक्रार केली होती.
चौकशीचे निर्देश
या तक्रार अर्जात नमूद मुद्यांबाबत आपल्या स्तरावर चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी कळवणचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, श्री सप्तश्रृंगी निवासी ट्रस्टचे सदस्य सचिव तथा तहसीलदार यांना सूचित केले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने ही तक्रार चौकशीसाठी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठविली आहे. उपरोक्त तक्रारीवर आपल्या स्तरावर कार्यवाही करावी, असे अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ यांनी म्हटले आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या सप्तश्रृंगी देवी मंदिरातील चांदीत २२ किलो तफावत आढळून येणे ही गंभीर बाब आहे. मंदिरातील मौल्यवान चांदी ही भाविकांच्या श्रद्धेची ठेव आहे. त्या संपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याकडूनच जर निष्काळजीपणा होत असल्याचा संशय निर्माण होत असेल, तर तो धोक्याचा इशारा आहे. या प्रकरणात सत्य बाहेर यावे, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि भाविकांचा विश्वास अबाधित राहावा, हीच अपेक्षा आहे. – विठोबा द्यानद्यान (माहिती अधिकार कार्यकर्ते).
