scorecardresearch

सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांचे निधन

२०१२ पासून आजपर्यंत त्यांनी वाचनालयाचे अध्यक्षपद भूषविले. सावानातील ग्रंथालयाच्या अद्यावतीकरणासाठी त्यांनी काम केले.

नाशिक : येथील सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर (७२) यांचे गुरुवारी सकाळी आजाराने निधन झाले. प्रा. औरंगाबादकर यांच्या निधनाने शहरातील शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

मु. शं. औरंगाबादकर यांचे ज्येष्ठ पुत्र असलेले विलास औरंगाबादकर यांची  २००७  मध्ये सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळात निवड करण्यात आली होती. २००८ ते २०१० या  कालावधीत ते वाचनालयाचे कार्याध्यक्ष होते. २०१२ पासून आजपर्यंत त्यांनी वाचनालयाचे अध्यक्षपद भूषविले. सावानातील ग्रंथालयाच्या अद्यावतीकरणासाठी त्यांनी काम केले.

महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र आणि केटिरग महाविद्यालयाचे प्राचार्यपद, नाशिकच्या चिन्मय मिशन संस्थेचे अध्यक्ष, आयुर्वेद सेवा संघाच्या समितीचे अध्यक्षपद अशी जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. मितभाषी, मृदुभाषी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांना आदर्श प्राचार्यासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी रंजना, ऑस्ट्रेलियात असलेला डॉ. अमेय आणि डॉ.अनय ही दोन मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.

येथील अमरधाममध्ये प्रा. औरंगाबादकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या विकासासाठी, वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी सांस्कृतिक-सामाजिक, शिक्षण क्षेत्रात प्रा. औरंगाबादकर सरांनी मौलिक योगदान दिले. वडील ग्रंथमित्र मु. शं. औरंगाबादकर यांच्या ग्रंथालय विकासाचा वसा आणि वारसा त्यांनी अविरतपणे पुढे नेला. सार्वजनिक वाचनालयात अनेक अभिनव उपक्रम त्यांनी सुरू केले. ग्रंथालय चळवळ लोकाभिमुख होण्यासाठी प्रयत्न केले. मैत्री जोपासणे, मदतीचा हात देणे त्यांच्या स्वभावात होते. त्यामुळे नाशिकमध्ये अनेक संस्थांशी ते जोडले गेले होते.  एक उत्तम मित्र व मार्गदर्शक आपल्यातून गेले आहेत.

– विश्वास ठाकूर (प्रमुख, विश्वास गृप)

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sarvajanik vachanalaya nashik chief vilas aurangabadkar passed away zws

ताज्या बातम्या