​मालेगाव: अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या सटाणा तालुक्यातील शरद दादाजी पवार यास मालेगाव येथील विशेष ‘पोक्सो’ न्यायालयाने जन्मठेप, आजीवन सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

​ काय आहे हे प्रकरण?

​सटाणा तालुक्यातील एका खेडेगावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपी शरद पवार याने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. मुलगी अविवाहित व अल्पवयीन असल्याने डॉक्टरांनी ही बाब तातडीने पोलिसांना कळवली. ​

जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यानंतर पीडितेच्या आईने तिला जायखेडा पोलीस ठाण्यात नेऊन आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली होती. लैंगिक अत्याचाराबरोबरच या प्रकरणाची वाच्यता करु नये म्हणून पीडितेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देखील आरोपीकडून दिली गेली होती. ​या प्रकरणी ऑक्टोबर २०२० मध्ये जायखेडा पोलीस ठाण्यात भादंवि ३७६ (२) (फ) (आय), ३७६ (३), ३२३,५०४ व ‘पोक्सो’ ॲक्टचे कलम ४ (२),६,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे आणि तपासी अंमलदार श्रीकृष्ण पारधी यांनी सखोल तपास करून मालेगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ​सदर खटला मालेगाव येथील विशेष ‘पोक्सो’ कोर्ट क्र. ३ चे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे ज्येष्ठ सरकारी वकील संजय सोनवणे यांनी जोरदार युक्तिवाद करत एकूण ६ साक्षीदार तपासले.

​ न्यायालयाचा निर्णय

​सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि सबळ पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी शरद पवार यास भादंवि ३७६ (२) (फ) (आय), ३७६ (३) अन्वये जन्मठेप, ‘​पोक्सो’ ॲक्ट कलम ६ अन्वये नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत आजीवन सश्रम कारावास आणि १०,००० रुपये दंड तसेच भादंवि कलम ५०६ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास आणि ५,००० रुपये दंड,अशी शिक्षा ठोठावली आहे. या खटल्याकडे बागलाण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून होते.

आठवडाभरातील जन्मठेपेची दुसरी शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याची बागलाण तालुक्यामधील आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे. या आधी बागलाण तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल नराधमाला आजीवन जन्मठेप ठोठावण्याचा निकाल गेल्या २४ जुलै रोजी येथील न्यायालयाने दिला होता.