नाशिक – वडिलोपार्जित घर नावावर करून देण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मागील काही वर्षांपासून भूमी अभिलेख विभागाचा कारभार वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. सटाणा येथील लाचखोरीच्या घटनेने त्यात नव्याने भर पडली.

तक्रारदाराचे वडील मयत असून, त्यांचे वडिलोपार्जित घर सटाणा येथील कोर्ट गल्ली परिसरात आहे. या घरावर वारसा हक्काने स्वतःचे नाव लावण्यासाठी तक्रारदाराने सटाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक देवेंद्र भावसार (वय ५१, रा. पंचकृष्णनगर, मनपा कार्यालयाजवळ, अंबड पोलीस ठाण्यासमोर, नाशिक) याच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी भावसार याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. तसेच कार्यालयात पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता, घर नावावर करून देण्यासाठी ५०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी सायंकाळी भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकांच्या दालनात लाच स्वीकारताना भावसार यास ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अन्वये सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विकास लोंढे यांनी जबाबदारी सांभाळली, तर सापळा पथकात हवालदार प्रभाकर गवळी आणि किरण धुळे यांचा समावेश होता. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी काम पाहिले.

नागरिकांना आवाहन

कोणत्याही शासकीय कार्यालयात शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणारी खासगी व्यक्ती लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तसेच ०२५३-२५७५६२८, २५७८२३० आणि व्हॉट्सॲपवरील ९५४५६५१०६४ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

‘भूमी अभिलेख’चा कारभार

मालमत्ता आणि शेतजमिनीशी संबंधित शासकीय कामकाजात आर्थिक देवाणघेवाणीशिवाय कोणतेही काम पुढे जात नसल्याच्या तक्रारी या निमित्ताने पुन्हा समोर आल्या आहेत. भूमी अभिलेख कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षांत लाच स्वीकारताना पकडण्यात आले आहे. ‘लक्ष्मी दर्शनाशिवाय या कार्यालयात कोणतेही काम होत नाही,’ अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. सटाणा येथील कारवाईमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.