मालेगाव : सटाणा तालुक्यातील ताहाराबाद येथे अवैध वाळू उपसा रोखल्याच्या रागातून वाळू माफियांनी एका कुटुंबावर हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोसम नदीपात्रातून वाळू काढण्यास मज्जाव केल्याने चिडलेल्या टोळक्याने घरात घुसून तोडफोड व महिलेस दमदाटी केली. तसेच बेदम मारहाण करत वृद्ध शेतकऱ्याचा दात पाडण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताहराबाद येथील मोसम नदीच्या किनाऱ्यावर बाळासाहेब महाजन (६६) यांचे निवासस्थान आहे. संशयीत या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा करत होते. त्यामुळे पर्यावरण नुकसानीचा विचार करून महाजन यांनी संशयीतांना ‘येथून वाळूचा उपसा करू नका’असे समजावून सांगितले होते. या सांगण्याचा राग मनात धरून संशयीतांनी महाजन यांना बेदम मारहाण करुन सूड उगवल्याचे सांगण्यात आले.
घरात घुसून तोडफोड
वाळू माफियांना समजावून सांगितल्यावर बाळासाहेब महाजन हे कामासाठी आपल्या शेतात निघून गेले. त्यानंतर संबंधित वाळू माफियांनी आणखी काही लोकांना सोबत घेत महाजन यांचे घर गाठले. त्यांच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश करत टोळक्याने प्रथम घरातील सामानाची फेकाफेक करून मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. यावेळी महाजन यांच्या सून ललिता या घरात हजर असताना संशयीतांनी त्यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, कोणाला मदतीसाठी बोलावू नये या उद्देशाने त्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून फेकून दिला. या घटनेने भयभीत झालेल्या ललिता यांनी कसाबसा संपर्क साधून सासरे महाजन यांना सर्व हकीकत सांगितली.
जीवे मारण्याची धमकी
महाजन यांच्या घरात तोडफोड केल्यावर सर्व संशयीत हे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ थांबले. महाजन यांनी तेथे जात “तुम्ही माझ्या घरात घुसून सामानाची तोडफोड का केली?” असा जाब त्यांना विचारला. हा जाब विचारल्याचा राग आल्याने एका संशयीताने त्यांच्या तोंडावर जोरात बुक्क्याने प्रहार केला. हा वार इतका भीषण होता की, त्यात त्यांचा दात पडून ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर संशयीतांनी हातातील काठ्यांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. “जर पुन्हा आम्हाला नदीतून वाळू काढण्यास विरोध केला, तर तुला आणि तुझ्या मुलाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत संशयीतांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या निमित्ताने ग्रामीण भागात वाळू माफियांची मग्रुरी कोणत्या थराला गेली आहे,हेच अधोरेखित होत आहे.
तिघांना अटक,अन्य फरार
याप्रकरणी हरिभजन सोनवणे,छोटू उर्फ हिराजी सोनवणे, रंगनाथ पवार,गणेश पवार, सोमा सोनवणे, अजय माळी व सतीश सोनवणे (सर्व रा. ताहराबाद, ता. सटाणा) या सात जणांविरोधात गंभीर दुखापत व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी हरभजन,छोटू व रंगनाथ या तिघांना अटक करण्यात आली आहे. अन्य चौघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास हवालदार भामरे हे करीत आहेत.
