नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकासआघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. यानंतरही सुधीर तांबेंनी आपला अर्ज दाखल केला नाही. दुसरीकडे सत्यजीत तांबेंनी याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. यानंतर पत्रकारांनी ‘काँग्रेसने एवढा विश्वास ठेवला होता. काँग्रेसने तुमच्या वडिलांना उमेदवारी जाहीर केली होती. तरी तुम्ही पक्षश्रेष्ठींचा आदेश का धुडकावला? काँग्रेस आणि भाजपाची एकत्र येण्याची काही रणनीती आहे का?’ असे प्रश्न विचारले. यावर सत्यजीत तांबेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (१२ जानेवारी) नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
सत्यजीत तांबे म्हणाले, “काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमची यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. किंबहुना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीच इच्छा होती की, मी निवडणूक लढवावी. परंतू तांत्रिक कारणामुळे डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, माझी उमेदवारी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे.”
“मी भाजपाच्या नेत्यांना जाऊन भेटणार आहे”
“सर्व पक्षाच्या लोकांनी मला मदत करावी. मी भाजपाच्या नेत्यांना जाऊन भेटणार आहे. तसेच त्यांनी मला मदत करावी अशी विनंती करणार आहे,” असंही सत्यजीत तांबे यांनी नमूद केलं.
हेही वाचा : “…म्हणून मी माझ्या नावाचा एबी फॉर्म असतानाही सत्यजीत तांबेंचा अर्ज भरला”, सुधीर तांबेंनी सांगितलं कारण
“…म्हणून बाळासाहेब थोरात उमेदवारी अर्ज भरताना सोबत नव्हते”
विशेष म्हणजे सत्यजीत तांबे उमेदवारी अर्ज भरताना बाळासाहेब थोरात उपस्थित नव्हते. याबाबत विचारलं असता सत्यजीत तांबे म्हणाले, “बाळासाहेब थोरात यांची तब्येत ठीक नाही. म्हणून ते आज उमेदवारी अर्ज भरताना सोबत नव्हते. ते आणि धनंजय मुंडे एकाच रुग्णालयात आहेत. त्यामुळे ते धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी गेले आहेत. ते दोघेही ब्रिचकँडी रुग्णालयात आहेत.”
काँग्रेस उमेदवार सुधीर तांबे काय म्हणाले?
सुधीर तांबे म्हणाले, “सत्यजीत तांबे राज्यात जे तरुण मुलं नेतृत्व करत आहेत त्यात एक दूरदृष्टी असलेलं युवानेतृत्व आहे. त्यांना वेगवेगळ्या विषयांचं सखोल ज्ञान आहे. त्यामुळे हे या निवडणुकीत हे नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं. त्यामुळे आम्ही सत्यजीत तांबे यांचा अर्ज भरला आहे. हा अर्ज महाविकासआघाडीच्या वतीने भरला आहे.”
हेही वाचा : फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यातच सत्यजित तांबे यांच्या बंडाची बिजे
“फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरला आहे”
“फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरला आहे. सत्यजीत तांबेंच्या नावाला काँग्रेसमधील काही पक्षश्रेष्ठींनी विरोध केला असं नाही. कोणी विरोध केला असेल असं मला वाटत नाही. कारण आमच्या पक्षाचंही हे धोरण आहे की, तरुण लोक राजकारणात आली पाहिजेत. काँग्रेसने तरुणांना संधी देण्याचं मोठं काम केलं,” असं मत सुधीर तांबेंनी व्यक्त केलं.
“…म्हणून माझ्या नावाचा एबी फॉर्म असतानाही सत्यजीत तांबेंचा अर्ज भरला”
सुधीर तांबे पुढे म्हणाले, “शेवटच्या क्षणापर्यंत विचार सुरू असतात. त्यामुळे माझ्या नावाची घोषणा झालेली असतानाही सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केला. सत्यजीत तांबेंनी दोन अर्ज भरले आहेत. एबी फॉर्म माझ्या नावाने आला होता. त्यामुळे थोड्या तांत्रिक अडचणी आहेत. परंतु या निवडणुकीत निवडणूक चिन्ह नसतं. त्यामुळे सत्यजीत या निवडणुकीत महाविकासआघाडीचे उमदेवार म्हणून उभे आहेत.”
हेही वाचा : “आम्हाला सतरंजा उचलायला ठेवलं का?”, नाना पटोलेंच्या स्वबळाच्या वक्तव्यावर अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले….
“सर्वच पक्ष सत्यजीत तांबेंना मदत करतील”
“सत्यजीत तांबे हे एक चांगलं नेतृत्व आहे. इथं बऱ्याच गोष्टी अशा असतात की, पक्षाच्याही पलिकडे विचार करावा लागतो. सर्वच पक्ष तसा विचार करत असतात. सर्वच पक्ष सत्यजीत तांबेंना मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे,” असंही सुधीर तांबेंनी नमूद केलं.