नाशिक – नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच होण्यासाठी या मार्गावरील लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यासाठी नऊ ऑगस्ट रोजी मोठे जनआंदोलन करण्यात आले होते. यासंदर्भात अभ्यासासाठी नेमण्यात आलेल्या डॉ. अनिल काकोडकर समितीला देण्यात आलेली ६० दिवसांची मुदत संपत आली आहे. समितीने केवळ तांत्रिक बाबींचा विचार न करता सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन जनसुनावणी घ्यावी आणि त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

नाशिक-पुणे रेल्वे सरळ मार्गाने म्हणजेच सिन्नर–संगमनेर–अकोले- राजगुरुनगर या मार्गानेच झाली पाहिजे, यासाठी नऊ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर सिन्नर तालुक्यातील समृध्दी महामार्गासह इतर ठिकाणी जनआंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात परिसरातील विविध गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यावेळी डॉ. अनिल काकोडकर समितीला मुदतवाढ देऊ नये तसेच समितीने केवळ तांत्रिक बाबींचा अभ्यास न करता जनसुनावणी घेऊन जनतेच्या भावना जाणून घ्याव्यात, अशा दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या.

या मागण्या प्रशासनाने शासनाचे प्रतिनिधी म्हणून निफाडच्या प्रांताधिकारी कार्यालयामार्फत लेखी स्वरूपात मान्य केल्या होत्या. दरम्यान, समितीला देण्यात आलेली ६० दिवसांची मुदत आता संपण्याच्या मार्गावर आहे. समितीची एक बैठक झाल्याची माहिती समोर आली असली, तरी अद्याप सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांची मते आणि भावना जाणून घेण्यासाठी कोणतीही जनसुनावणी झालेली नाही, असे आमदार तांबे यांनी निदर्शनास आणले आहे.

आमदार सत्यजीत तांबे पुढे म्हणाले, “शासनाच्या प्रतिनिधींनी आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या आहेत. त्यामुळे समितीने सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. केवळ तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास करून अहवाल देता कामा नये. जनतेच्या भावना समजून घेऊनच समितीने आपला अहवाल द्यावा, अशी आमची ठाम भूमिका आहे.”, असे त्यांनी मांडले.

पुणे–नाशिक रेल्वे सरळ मार्गाने सिन्नर-संगमनेर-अकोले-राजगुरुनगर मार्गेच गेली पाहिजे, याबाबत आमची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे. समितीवर आमचा दबाव कायम असून, सर्व घटकांच्या भावना समजून घेऊनच योग्य अहवाल सादर केला जावा, अशी अपेक्षा आमदार तांबे यांनी व्यक्त केली. पुणे–नाशिक रेल्वे सरळ मार्गाने करण्याची मागणी मान्य झाली नाही, तर पुढील काळात पुन्हा तीव्र आंदोलन उभारले जाईल. प्रसंगी मुंबई–पुणे एक्सप्रेस हायवे बंद करू, पण पुणे–नाशिक रेल्वे सरळ मार्गाने करण्याच्या मागणीवरून मागे हटणार नाही, असा इशाराही आमदार सत्यजीत तांबे यांनी दिला आहे. .