scorecardresearch

विविध उपक्रमांद्वारे स्वा. सावरकरांना अभिवादन

सावरकरांची विज्ञान निष्ठा, देशभक्ती याबाबतचे विचार सर्वानी आत्मसात करावे असे आवाहन रहाळकर यांनी केले.

विविध उपक्रमांद्वारे स्वा. सावरकरांना अभिवादन
नाशिक येथे अभिनव भारत मंदिरात स्वा. सावरकर यांना अभिवादन करण्यात आले.

‘नाएसो’ संस्थेच्या शाळांमध्ये २३ हजार विद्यार्थ्यांचा ‘जयोस्तुते’चा जयजयकार, सावरकरांवरील चित्रपटाचे सादरीकरण, त्यांच्या कार्याची भित्तीपत्रकाद्वारे माहिती, शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष व्याख्याने, अभिनव भारतमध्ये प्रतिमा पूजन.. स्वा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी सावरकर यांना अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.
सावरकर यांचे वास्तव्य असलेल्या अभिनव भारतच्या कार्यालयात नगरसेवक शाहू खैरे, स्मारकाचे समन्वयक भरद्वाज रहाळकर आणि भगुरचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांना आदरांजली वाहत कार्यकर्त्यांनी ज्योत प्रज्वलित करत भगूरला कूच केले. नागरिकांनी या ठिकाणी भेट देत सावरकरांना आदरांजली वाहिली. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्यावतीने सावरकरांच्या सर्व शाळांमध्ये दोन्ही सत्रात ‘जयोस्तुते’ हा अनोखा कार्यक्रम घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी..’, ‘जयोस्तुते. जयोस्तुते.’ ही सावरकरांची स्फूर्तीदायक गीते सामूहिकरित्या गायली. सीडीओ मेरीच्या प्रांगणात सामूदायिकरित्या गायन करत सावरकरांना अभिवादन करण्यात आले. त्यात मेरी हायस्कूल, सागरमल प्राथमिक (मेरी विभाग), इंग्लिश मिडियमच्या चार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर हेते. यावेळी शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड, प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अशोक मुर्तडक, शिक्षण मंडळ उपसभापती गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.
सावरकरांची विज्ञान निष्ठा, देशभक्ती याबाबतचे विचार सर्वानी आत्मसात करावे असे आवाहन रहाळकर यांनी केले. मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यालयात सावरकरांची सामूहिक गीते झाली. आत्मार्पण दिनानिमित्त सावरकरांनी लिहिलेल्या कविता, त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग यावर आधारीत माहितीपर भित्तीपत्रिका प्रत्येक वर्गाच्या बाहेर लावण्यात आले. सावरकरांच्या जीवनावरील चित्रपट सादर करण्यात आला. ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका माधुरी मरवट यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राजेश भुसारे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वातंत्र्य लढय़ातील योगदानाविषयी माहिती दिली. भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले.

 

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या